Published On : Thu, Aug 18th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मतदार छायाचित्र अपडेट करण्यात राज्यातील महानगरात नागपूर प्रथम – आर. विमला

Advertisement

महिला मतदारांच्या संख्या वाढीवर भर,मतदार नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद द्या,निवडणूकसंदर्भात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक

नागपूर : मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम वर्षात चारदा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल,1 जुलै, 1 ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या दिनांकावर 18 वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवारास मतदार नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यास त्याचा लाभ मतदारास लवकर मिळतो. त्यासाठी निवडणूक ॲपचा वापर करावा व मतदार नोंदणी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. यासोबत मतदार छायाचित्र अपडेट करण्यात राज्यातील महानगरात नागपूर प्रथम असल्याचे त्यांनी सांगितले.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मतदार यादीशी आधार क्रमांक जोडणी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघच्या मतदार यादीत नाव नोंदणी कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर, उपविभागीय अधिकारी नागपूर शेखर घाडगे, तहसिलदार राहूल सारंग तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मतदार पुनरिक्षण कार्यक्रम वर्षातून चारदा होणार असल्यामुळे मतदारांनी नमूना 6-ब भरुन नाव नोंदणी, वगळणी व इतर बदल करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. काही तालुक्यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या कमी आहे. महिला मतदारांच्या संख्या वाढीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. राजकीय पक्षांनी मतदान कार्डशी आधार संलग्न करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी सहकार्य करावे. आधार संलग्न मतदान कार्ड करणे हे ऐच्छिक असून त्यामुळे एकाच मतदाराचे नाव विविध मतदार संघात असल्यास ते कळेल व एकच व्यक्तीसाठी एकच मतदान कार्ड राहील, त्यासोबतच मतदाराची ओळख प्रस्थापित होऊन मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण होईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. आधार संलग्न मतदार कार्ड करणे हे महत्वाचे आहे. या मोहीमेस सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया 1 ऑक्टोबर पासून सुरु असून प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर प्रसिध्द होणार आहे. 1 नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारीत शिक्षक मतदार संघासाठी शिक्षकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

मतदान नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आणि रितीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्तींचा आधार क्रमांक मतदार यादीशी संलग्न करण्यात येईल. आधार जोडणीसाठी नमूना क्रमाक 6-ब भरुन देण्यात यावा. ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र 6-ब ERO Net, GARUDA, NVDP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

आता वर्षातून चार वेळा हे शिबीर घेण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम घरोघरी भेट देवून राबविण्यात येणार आहे. शंभरटक्के मतदारांशी संपर्क साधून त्यांचेकडून 31 मार्च 2023 पूर्वी नमूना अर्ज क्र. 6-ब मध्ये आधार क्रमांक उपलब्ध करुन घेण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, मतदारांनी आधार क्रमांक उपलब्ध करुन द्यावा, हे या मोहिमेचे मूलभूत तत्व आहे. राजकीय पक्षांनी याबाबत जनतेत जनजागृती करावी व या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर व उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी केले. यावेळी अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याविषयावर चर्चा केली.

Advertisement