१९ नोव्हेंबर १९९६ ला मनपाने केला होता लतादीदींचा नागरी सत्कार : विदर्भ आणि नागपूरचे केले तोंडभरून कौतुक
नागपूर: ‘विदर्भात माणसाचा सच्चेपणा आणि मोठेपणा दिसतो. नागपूरला मी भारतीय पुरातन संस्कृतीची प्राचीन राजधानी मानते. नागपुरात एखादा कार्यक्रम उधळला म्हणून मी नागपूरला येणारच नाही, इतकी मी वेडी, नादान वा खाष्ट नाही आणि भित्री तर नाहीच नाही. नागपूरकरांवर मी रागावले म्हणून मी इथे येत नाही हा आरोप अगदी मिथ्या आहे. आज मनमोकळेपणाने संवाद होतोय. आता कार्यक्रम सादर करण्याची संधीही नागपूरकर लवकर आणतील अशी आशा करते. तुम्ही बोलवा, मी लगेच येते की नाही ते पहा’, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे शब्द नागपूर आणि विदर्भावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेसे ठरावेत.
नागपूर महानगरपालिकेद्वारे १९ नोव्हेंबर १९९६ रोजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी लतादीदींनी नागपूरकरांशी साधलेला हा संवाद. त्यावेळी सत्कार कार्यक्रमाला तत्कालीन महापौर कुंदाताई विजयकर, उपमहापौर निखारे, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दत्ता मेघे, गुलाबराव गावंडे, माजी महापौर अटलबहादूर सिंग उपस्थित होते.
सिव्हिल लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये हा नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती ही लक्षणीय होती. नागरी सत्कार कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांकडून लतादिदींना गीत गाण्यासाठी करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी लतादिदींनी पसायदान गायले होते. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर सुद्धा त्यावेळी उपस्थित होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नागपूर महानगरपालिकेद्वारे नागरी सत्कार व्हावा यासाठी तत्कालीन माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या विशेष पुढाकार घेतला होता. त्यावेळी भाषणात लतादिदींनीही अटलबहादूर सिंग यांच्यामुळे नागपूरकरांशी मनमोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली असल्याची भावना व्यक्त केली होती.
त्यावेळी भाषणात लतादिदींनी विदर्भ आणि नागपूरचे तोंडभरून कौतुक केले होते. ‘महाभारतात महाराष्ट्राचा उल्लेख कुठेही येत नाही पण विदर्भाचा वारंवार येतो. म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्र हे नावही अस्तित्वात नव्हते त्यावेळी विदर्भ हे वैभवशाली राज्य होते. माझ्या या विधानावर राजकारणी, विद्वान, संशोधक, समीक्षक यांच्यामध्ये वादावादी होणार. पण या साऱ्यांना एक कलाकार वितंडवादापेक्षा आणि कुठला आनंद देणार? असो. म्हणून मी नागपूरला पुरातन संस्कृतीची प्राचीन राजधानी मानते. आणि ही भारतीय पुरातन संस्कृती, त्या संस्कृतीची जीवनमूल्ये विदर्भाने अजून जपून ठेवली आहेत, याचा मला अभिमान आहे. जुन्या वास्तूत किंवा प्राचीन मंदिरात प्रवेश करताना जो भाव मनात रुंजी घालतो पण नंतर तो व्यक्त करता येत नाही. ते अव्यक्त भावविश्व आज माझ्या मनात कोंदाटले आहे, अशा शब्दांत त्यांनी नागपूर आणि विदर्भावरील प्रेम व्यक्त केले होते.
कवी ग्रेस यांच्या कवितेच्या ‘सगळ्याच ऋतूंना मिळते दु:खाचे उत्कट दान’ या दोन ओळींचे स्मरण करीत त्यांनी विदर्भाच्या उत्कटतेवर अत्यंत मार्मिक विवेचन केले. ‘निसर्ग जसे मानवाला उत्कट दान देतो, तसे उत्कट दान एखादी संस्कृती एका प्रांताला देते. प्राचीन संस्कृतीचे, जीवनमूल्यांचे, विद्वतेचे, शौर्याचे, साधेपणाचे, निष्कपट हृदयाचे व उदार मनाचे उत्कट दान विदर्भाला ईश्वराने दोन हातांनी दिले आहे. या अगत्याचा मी कालपासून अनुभव घेत आहे. उजव्या हाताचे दान डाव्या हाताला कळू द्यायचे नाही, हा मनाचा सच्चेपणा व मोठेपणा फक्त विदर्भातच दिसतो. जे मनापासून आवडले ते निर्भयपणे डोक्यावर घेणे व जे आवडले नाही ते तितक्याच निर्भयतेने फेकून देणे, ही विदर्भाला मिळालेली आणखीन एक देणगी, असेही त्या म्हणाल्या होत्या. विदर्भात कलावंतांची होणारी कदर यावर वडिल मा. दीनानाथ मंगेशकर नेहमी ‘लता, कंपनी तोट्यात आली की आम्ही विदर्भाचा दौरा काढतो. ६ महिन्यांत सारे ठिकठाक होते.’ असे सांगत असल्याचीही आठवण त्यांनी सांगितली होती.
१९९६ च्या ४०-४५ वर्षापूर्वी नागपुरात काही गैरसमजूतीमुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर मनपाच्या नागरी सत्कार कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शविली. तेव्हा त्यांनी त्या गैरसमजूतीवरही वक्तव्य करीत अनेक शंकांना मुठमाती दिली. ’४०-४५ वर्षांपूर्वी माझ्या कार्यक्रमात काही गैरसमजुतींमुळे गोंधळ झाला. तो राग मनात धरून मी नागपुरात येत नाही, असा काही लोकांचा गैरमज आहे. तक्रार आहे. टीकाही आहे. राग, तक्रार आणि टीका हेही विदर्भाला मिळालेले खास दान आहे. गेली ५० वर्षे मी माझ्या कामात इतकी व्यस्त आहे की, हिंदुस्थानातील मोठमोठ्या शहरी मी एक सुद्धा कार्यक्रम अजून केला नाही. त्या गोंधळात झालेल्या कार्यक्रमानंतर नागपुरात मला कोणी बोलाविले नाही आणि काळाच्या ओघात ४० वर्षे सहज विरून गेली. नागपूरकरांवर मी रागावले म्हणून मी येथे येत नाही हा आरोप अगदी मिथ्या आहे. कारण ज्या सांगली शहरात माझ्या वडिलांच्या घरादाराचा लिलाव झाला, बेअब्रू झाली त्याच सांगली शहरात मी हॉस्पिटलच्या मदतीसाठी कार्यक्रमही केला आणि अनेक वेळा मी तिथे जाते. त्या शहरावर मी कधी राग धरला नाही. ज्या शहरात माझ्या वडिलांचा विपन्नावस्थेत मृत्यू झाला त्या पुणे शहराचाही मी द्वेष करीत नाही. उलट ‘दीनानाथ प्रतिष्ठान’ स्थापून त्या प्रतिष्ठानाद्वारे अनेक कार्यक्रम आम्ही पुणे येथे केले. ज्या शहरात आपण वाईट दिवस पाहिले, आपल्याला वाईट अनुभव आले, ते शहर वाईट किंवा दुष्ट असे मानण्याइतकी मी मूर्ख नाही आणि दीर्घद्वेषीही नाही. शहरं तीच असतात, माणसंही तीच असतात. कोणीही वाईट वा दुष्ट नसतं. वाईट असते ती आपली वेळ, वाईट असते ती नियतीची खेळी. एक गाणं खराब झालं म्हणून कोणी गाणं सोडून देत नाही. नागपुरात एक कार्यक्रम उधळला म्हणून नागपूरकरांचे तोंड पाहायचे नाही, इतकी मी वेडी, नादान वा खाष्ट नाही आणि भित्री तर नाहीच नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी जुन्या सर्व गैरसमजांना फेटाळून लावले.
हे सर्व सांगतानाच त्यांनी विदर्भातले प्राचार्य राम शेवाळकर ते गजलकार सुरेश भटापर्यंत अनेक स्नेही विदर्भात असल्याचे सांगितले. श्री. साळवेसाहेब, श्री. वसंतरावजी साठे हे अगदी जवळचे स्नेही, वडिलधारे असल्याचे त्या म्हणाल्या. फक्त शहरी कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची संधी लाभली नाही. नियतीच्या ते मनात नसावे, अशी पुष्टीही शेवटी त्यांनी जोडली होती.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत, सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नागरी सत्काराने त्यांच्या नागरी सत्काराने नागपूर महानगरपालिकेचा गौरव झाला आहे. मनपातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!