नागपूर: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील गैरसोयींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिंदे सरकारवर सडकून टीका केली. राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी गेल्यावर्षी २५८ औषधांची मागणी केली होती. त्यापैकी केवळ २२ औषधांचा पुरवठा झाला. तर यंदा केवळ ३ औषधांचाच पुरवठा झाला, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
दरम्यान याप्रसंगी प्रामुख्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, दुष्यंत चतुर्वेदी, प्रमोद मानमोडे, नितीन तिवारी आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आदित्य ठाकरे यांनी यावेळी मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे आणि इतर विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
नागपुरातील मेडिकलमध्ये सगळ्याच संवर्गातील एक हजारावर पदे रिक्त आहेत. त्यानंतरही डॉक्टर-कर्मचारी रुग्णांना आपली सेवा देतात. परंतु, औषधांचा पुरवठाच करण्यात येत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह सर्व राजकीय पक्षांनी विचार करून शासकीय रुग्णालयांत समस्या दूर करण्याचे प्रयत्न करायला हवे.
मी या ठिकाणी राजकारण करायला आलो नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या सूचनेनुसार राज्यातील शासकीय रुग्णालयांत फिरून आढावा घेत आहे. त्यानुसार नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर नागपुरातील मेडिकल रुग्णालयाचा आढावा घेतल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.