Published On : Tue, Jul 2nd, 2024

नागपूर मर्सिडीज अपघात प्रकरण; रितिका मालूची अटक बेकायदेशीर म्हणत न्यायालयाकडून पीसीआर रद्द!

पोलीसांना दिले मलूला तत्काळ सोडण्याचे आदेश
Advertisement

नागपूर: रामझुला हिट अँड रन प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी रितिका मालूची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हणत कनिष्ठ न्यायालयाने पीसीआरची पोलिसांची मागणी फेटाळली आहे. यासोबतच मालूला लवकरात लवकर सोडण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले.

माहितीनुसार, सोमवारी आरोपी रितू मालूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते, तर आज पोलिसांनी मालूला न्यायालयात हजर केले. या सुनावणीदरम्यान न्यायाधीश ए.व्ही. खेडेकर यांनी हे निर्देश दिले आहे. सुनावणीदरम्यान पोलिसांनी मालूच्या पीसीआरची मागणी केली.

Advertisement

याला मालूच्या वकिलाने विरोध केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मालूची अटक बेकायदेशीर ठरवत पीसीआरची मागणी फेटाळून लावली. यासह न्यायालयाने मालूला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान रामझुल्यावर 25 फेब्रुवारी रोजी मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सडिज कार चालवत रितिका मालूने दोन तरुणांना चिरडले. या अपघातात मोमीनपुरा येथील मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34) आणि जाफर नगर येथील मोहम्मद आतिफ (32) यांचा मृत्यू झाला.

तत्पूर्वी आरोपी रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळल्यानंतर तिला अटक होणार हे निश्चित झाले होते. अटकेच्या अगोदरच रितू मालूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.