Published On : Fri, Jan 12th, 2024

एव्हिएशन हबच्या दिशेने नागपूरची वाटचाल

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : एएआर-इंडामेरच्या एमआरओचे उद्घाटन
Advertisement

नागपूर – नागपूर हे झिरो माईलचे शहर आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वांत विकसित शहर म्हणून नागपूरला नावलौकिक मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विशेषत्वाने नागपूरने आता एव्हिएशन हब होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विदर्भात रोजगार निर्मितीसाठी याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केला.

एएआर-इंडामेर कंपनीच्या मिहान सेझमधील एमआरओचे केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी १०० विमानांचे सी-चेक पूर्ण झाल्याचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची उपस्थिती होती. तर खासदार प्रफुल्ल पटेल, एएआर-इंडामेरचे संचालक प्रजय पटेल, इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एलबर्ग, इंडिगोचे उपाध्यक्ष (इंजिनीअरिंग) एस. सी. गुप्ता, एअरबसचे दक्षिण आशियातील ग्राहक सेवा प्रमुख लॉरी एल्डर, माजी खासदार विजय दर्डा यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘भारताची डोमेस्टिक एव्हिएशन इंडस्ट्री जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्राचा विकास दर २२ टक्के आहे. एव्हिएशन उद्योगात एमआरओ अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. तसेच भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बायो एव्हिएशन फ्युअलचा विचार व्हायला हवा. एएआर-इंडामेर कंपनीने रोजगार देताना विदर्भातील तरुणांना अधिकाधिक संधी द्यावी.’ भविष्याची गरज लक्षात घेता एव्हिएशन-एरॉनॉटिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांशी सामंजस्य करार करायला हवा. त्यातून एव्हिएशन तसेच एमआरओ इंडस्ट्रिला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळू शकेल, असेही ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले.

Advertisement