नागपूर : एका काळी अधिकाऱ्यांच्या कमतरतेने ग्रस्त असलेली नागपूर महानगरपालिका आता वर्ग एक अधिकारी कॅडरच्या योग्य संख्येने सज्ज आहे. विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिकेत प्रथमच तीन आयएएस अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर कार्यरत आहेत. अलीकडेच मनपात रुजू झालेल्या दोन अतिरिक्त आयुक्तांना केवळ विभागांचे वाटपच झालेले नाही, तर मनपा आयुक्तांनी त्यांच्या अधिकारांतही लक्षणीय वाढ केली आहे.
या निर्णयामुळे आयुक्तांचा कामाचा बोजा हलका होईलच, शिवाय प्रशासनाच्या कामकाजालाही वेग येईल. अतिरिक्त आयुक्त म्हणून मनपात रुजू झालेल्या वसुमना पंत आणि वैष्णवी बी यांना विभागांचे वाटप करण्यात आले आहे.
सध्या मनपात तीन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत आणि त्यांना आयुक्तांनी विविध विभागांची जबाबदारी दिली आहे. काही महत्त्वाचे विभाग अजूनही मनपा आयुक्तांकडेच आहेत, पण स्वतःच्या कार्यक्षेत्रातील कामाचा बोजा हलका करण्यासाठी आयुक्तांनी या दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांना अधिक अधिकार बहाल केले आहेत.डीपीडीसी,पीडब्ल्यूडी,पीएचई या विभागांशी संबंधित २५ लाख रुपयांपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा आणि टेंडर प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आता वसुमना पंत आणि वैष्णवी बी यांना देण्यात आला आहे.
यापूर्वी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्याकडे अशा प्रकारच्या केवळ १० लाख रुपयांपर्यंतच्या कामांचा निर्णय घेण्याचा अधिकार होता.आयुक्तांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कामाचा बोजा कमी होईलच, शिवाय प्रशासनातील निर्णय प्रक्रियेला गती मिळेल, हे निश्चित आहे.