नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या दोन कामगारांना शनिवारी हिल रोड येथील नाल्याच्या सफाईचे काम करत असताना मारहाण केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तिघांना अटक केली. या हल्ल्यात कर्मचार्यांना तळहातावर आणि मनगटावर जखमा झाल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पियुष गजानन काळबांडे (19), शैलेश पृथ्वीराज ब्राम्हणे (25) आणि समीर रूपचंद दुपारे (29, सर्व रा. अंबाझरी टेकडी, भीम चौक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचे कर्मचारी सातपुते आणि विक्रम चव्हाण हे उत्खनन यंत्राच्या सहाय्याने नाला साफ करण्याचे कर्तव्य बजावत होते. दुपारी दोनच्या सुमारास आरोपी दारू पिण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्यांनी कामगारांना शिवीगाळ केली. त्यानंतर हे मद्यपी तरुण धारदार तलवारी घेऊन परतले. त्यानंतर त्यांनी कामगारांवर हल्ला केला. बाचाबाचीत सातपुते यांच्या बोटाला दुखापत झाली, तर चव्हाण यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली.
कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंबाझरी पोलिसांनी पियुष काळबांडे, शैलेश ब्राम्हणे आणि समीर दुपारे या तिन्ही आरोपींवर भादंवि आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.