नागपूर : गणेशोत्सवादरम्यान पीओपी मूर्तींच्या विरोधात नागपूर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. यंदा पीओपी मूर्तीं शहरातच येणार नाही याची दक्षता घेतली पालिकेकडून जाणार आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांची एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे आता या प्रकारावर आता नजर राहणार आहे.
पीओपी मूर्तीच्या विषयासंदर्भात शुक्रवारी महापालिका प्रशासनाच्यावतीने पोलिस, शहरातील पारंपरिक मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत शहरात पीओपी मूर्तींची निर्मिती अथवा खरेदी-विक्री होऊ नये, याकरिता आतापासूनच उपाययोजना करण्यात आल्या. यादृष्टीने पोलिस प्रशासन, शहरातील पारंपरिक मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मनपाद्वारे कार्यवाही केली जाईल.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर शहरात पीओपी मूर्तींची निर्मिती, विक्री आणि खरेदी यांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे, हे विशेष.