नागपूर :नवीन वर्षानिमित्ताने नागपूर महानगर पालिकेने नागपूरकरांना मोठा दिलासा दिला आहे.शहरातील मालमत्ता, पाणीकर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने ‘अभय योजना’ आणली आहे. थकीत मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागाची दुकाने, ओटे, जागेच्या वापर शुल्कावरील शास्ती व दंडात ८० टक्के सूट असलेल्या अभय योजनेचा उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुभारंभ केला.
दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर शहरातील थकबाकीदारांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. यावेळी जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. नितीन राऊत, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, विकास ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते.
‘अभय योजने’अंतर्गत १ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागाचे दुकाने, ओटे, जागेच्या वापर शुल्कावरील शास्ती व दंडात ८० टक्के सूट दिली जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना मनपा मुख्यालय किंवा संबंधित झोन कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने देखील कर, शुल्क जमा करता येईल. या योजनेचा लाभ नागपूर शहरातील जवळपास ४.५ लाख थकबाकीदारांना मिळणार आहे.