नागपूर : शहरातील सक्करदरा पोलीस स्टेशन परिसरात काल रात्री म्हणजेच १६ फेब्रुवारीला घडलेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली. शाहू गार्डन परिसरात कुख्यात गुंड कार्तिक चौबेची निर्घृण हत्या करण्यात आली. रोशन गायकवाड नावाच्या तरुणाने त्याच्यावर हल्ला केला.२८ वर्षीय कार्तिक चौबेची नुकतीच एका खून प्रकरणात तुरुंगातून सुटका झाली.
तुरुंगातून सुटल्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. काल रात्री, तो त्याच्या काही मित्रांसोबत दारू पित बसला असता त्याचे किरकोळ कारणावरून रोशन गायकवाडशी भांडण झाले.
माहितीनुसार, भांडण इतके वाढले की कार्तिकने रागाच्या भरात रोशनच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. ज्यामुळे रोशन जखमी झाला. पण रोशनने लगेचच खिशातून एक चाकू काढत कार्तिकवर प्रतिहल्ला केला. त्याने त्याच्या छातीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की कार्तिक जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
कार्तिकची आई, श्रीमती आरती उमेश चौबे (५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कार्तिक आणि रोशन गायकवाड यांच्यातील वाद वाढला होता. रोशनने त्याच्या मित्रांसह कार्तिकवर हल्ला केला. सक्करदरा पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे नागपुरातील वाढत्या गुन्हेगारींच्या घटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.शहरातील रस्त्यांवर असे रक्तरंजित खेळ किती काळ खेळले जाणार आहेत? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.