नागपूर : नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने धाड (ED Raid) टाकल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळपासूनच उके यांच्या नागुपरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु आहे.
मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावेळी उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे. ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती.
त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे.
काय आहे प्रकरण?
नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकली आहे. पार्वती नगर भागातील निवासस्थानी गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे.