Published On : Sat, Aug 15th, 2020

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत नागपूर पॅटर्न राबविणार -पालकमंत्री

विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न

नागपूर : सध्या प्रत्येकजण कोविड 19 या वैश्विक महामारीशी संपूर्ण जग लढा देत आहे. नागरिकांचे आरोग्य हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, कोरोना मुक्तीबाबत नागपूर पॅटर्न विकसीत करुन तो यशस्वीपणे राबविणार असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले.

Gold Rate
Saturday08 Feb. 2025
Gold 24 KT 85,100 /-
Gold 22 KT 79,100 /-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.

जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या सभापती शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त मनपा आयुक्त जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, माजी खासदार गेव्ह आवारी यांच्यासह वरिष्ठ पोलिस व प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिल्याचे सांगत महाराष्ट्र देशातील प्रगतशील राज्य असून, राज्याच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाचा कोरोना मुक्तीवर अधिक भर आहे. कोरोना मुक्तीसोबतच उद्योग व्यवसाय, शिक्षण व रोजगाराला चालना देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून, गेल्या साडेचार महिन्यांपासून आपणही त्याच्याशी लढा देत आहोत. संकट मोठे आहेच. अचानक उद्भवलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकजण जोरकस प्रयत्न करत असल्याचे सांगून श्री. राऊत यांनी राज्य सरकार या दिशेने भक्कमपणे पावले टाकीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोविड-19 हाच प्राधान्यक्रम आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व नर्सींग स्टाफ जिवाची पराकाष्ठा करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. नागपूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी चांगले प्रयत्न केले असून, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड्ससोबतच मुंबई, पुण्याच्या धर्तीवर जम्बो हॉस्पीटलच्या उभारणीबाबत प्रशासनाने पडताळणी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात आरोग्याच्या पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात यंत्रणेला यश आले असले तरीही अद्यापही मोठा टप्पा गाठणे शिल्लक असल्याचे सांगून राज्याच्या प्लाझ्मा थेरपीची (प्लॅटिना प्रकल्पाची) जबाबदारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयावर देण्यात आली आहे. आतापर्यंत 17 कोविड योद्ध्यांनी प्लाझ्मा दान केल्याचे सांगून जास्तीत जास्त कोविड योद्ध्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

कोरोनामुक्ती सर्वपक्षीय नेत्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतल्याचे सांगून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक सेवा पुरविण्यात विविध स्वयंसेवी संस्थांनी मोठा हातभार लावला. तसेच कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासोबतच लॉकडाऊनमध्ये पोलीस विभागाने चोख कर्तव्य पार पाडले. याकाळात काही पोलिस अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमित झाले, तर कर्तव्यावर असताना काहींना प्राण गमवावे लागल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबिंयाप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

कोविड काळात जिल्हा नियोजन, जिल्हा खनिकर्म व एसडीआरएफ निधीमधून 58 कोटी रुपयांच्या निधीतून आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच यापुढेही निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही देत यापुढे प्रशासन व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी SOP (प्रमाण कार्य पध्दती)चा वापर करण्याचे आवाहन केले.

कोरोनामुक्तीसाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच सर्व समाजघटकातील नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. सामूहिक प्रयत्नांसोबतच एकत्रित लढा देऊन कोरोनाला पराभूत करायचे आहे.

नागपूर जिल्हा विकासात अग्रेसर राहणार असून, अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून कायापालट करण्यात येईल. कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौन्दर्यीकरण करण्याचे प्रस्तावित असून, फुटाळा तलाव येथे बुध्दिस्ट थीम पार्क यशवंत स्टेडीयम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नविन स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर उभारुन देशविदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू बनविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. नागपूर हे देशातील पहिले स्मार्ट शहर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पर्यटन हे सर्वांगीण विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. यातून हॉटेल व सेवा उद्योग विकसित होतील. यामुळे एकूण घरगुती उत्पादन आणि दरडोई उत्पन्न वाढीस लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी जिल्हयातील 54 हजार 819 सभासदांना विविध बँकांमार्फत 617 कोटी 34 लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. राज्य सरकार सत्तेवर येताच महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्हयातील 37 हजार 973 शेतकऱ्यांच्या खात्यावर 327 कोटी 25 लाख रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाजॉब्सच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याला प्राधान्य असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजनेचे काम देखील प्रगतीपथावर असल्याबाबत त्यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने तर सहा. पोलिस उपनिरीक्षक मोहन शर्मा यांना गुणवत्तापूर्वक सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच शंकर हिंगेकर, संतोष तोतवानी, अशोक हिंगेकर, पद्माकर हिंगेकर, प्रमोद पहाडे आणि मोहम्मद अवेस हसन या कोविड योद्ध्‌यांनी प्लाझ्मा दान केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माजी स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थित नागरिकांना भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महेश बागदेव यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement