नागपूर: पेट्रोल पंपावरील वृद्ध चौकीदाराची हत्या करून लुटारूंनी १३ लाखांची रोकड असलेली तिजोरी पळवून नेली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे १ ते २ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. नूरखान मदरखान (वय ८०) असे मृत चौकीदाराचे नाव असून ते हसनबागमधील दानिश प्लॉटमध्ये राहत होते.
नंदनवन मुख्य रस्त्याला लागून पंचशील आॅटोमोबाईल्स आहे. मुस्तफा हसनजी यांच्या मालकीच्या या पेट्रोल पंपावर नूरखान अनेक वर्षांपासून चौकीदारी करायचे. दिवसभराच्या व्यवहाराचा नेहमीप्रमाणे हिशेब केल्यानंतर रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास पंपावरील कर्मचारी निघून गेले. त्यानंतर नूरखान यांनी पंपावरची कॅबिन सांभाळली. मध्यरात्री १ च्या सुमारास चार लुटारू तोंडावर कपडा बांधून पंपावर आले. यावेळी नूरखान जागेच होते. त्यांनी लुटारूंना हटकले. लुटारूंकडे सब्बल आणि कु-हाड होती. त्यांनी धाक दाखवून नूरखान यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्ध नूरखान यांनी लुटारूंना न घाबरता तेथून हुसकावण्याचा प्रयत्न केला. ते आक्रमक झाल्याचे पाहून लुटारूंनी त्यांच्यावर कु-हाडीचे घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यानंतर पंपाच्या कॅबिनमध्ये असलेली पैशाची छोटी तिजोरी उचलून आरोपी पळून गेले. पहाटेच्या वेळी साफसफाईसाठी आलेल्या कर्मचा-याला नूरखान रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने त्याने आरडाओरड केली. ते ऐकून आजुबाजुला काम करणारे धावून आले. त्यांनी ही माहिती पंपाचे संचालक मुस्तफा हसनजी आणि नंदनवन पोलिसांना कळविली. त्यानुसार, पंपाचे संचालक मुस्तफा तसेच नंदनवनचेठाणेदार नलावडेंसह पोलीस पथक पंपावर पोहचले. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. लुटारूंनी नूरखानची हत्या केल्यानंतर तिजोरी पळविताना कु-हाड आणि सब्बल तेथेच फेकून दिली. बँक बंद असल्यामुळे दोन-तीन दिवसांच्या विक्रीचे १३ लाख रुपये तिजोरीत होते, अशी माहिती मुस्तफा यांनी पोलिसांना दिली.
पोलीस दलात खळबळ
चौकीदाराची हत्या करून १३ लाखांची रोकड लुटण्यात आल्याचे कळाल्याने पोलीस दलातही प्रचंड खळबळ उडाली. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात दोन मोटरसायकलवर आलेल्या चार लुटारूंनी नूरखान यांची हत्या करून तिजोरी पळविल्याचे चित्रण आहे.
दरम्यान, कु-हाड आणि सब्बल वरून ठसे तज्ज्ञांनी आरोपींचे ठसे घेतले. तर, श्वानाला ते सुंघविण्यात आल्यानंतर त्याने नूरखानच्या मृतदेहापासून केवळ १०-१५ फुटापर्यंतचाच मार्ग दाखवला. तेथे घुटमळल्यानंतर श्वान एका ठिकाणी बसले. त्या ठिकाणी दुचाक्यांच्या टायरचे निशान होते. बाजुच्या सीसीटीव्हीमध्ये तोंडाला कापड बांधलेले चार लुटारू दोन दुचाकीने पळून जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी मुस्तफा यांच्या तक्रारीवरून हत्या करून रोकड लुटल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींच्या ठशांवरून त्यांचा शोध घेण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.
नंदनवनमधील वातावरण गरम
नंदनवनमध्ये गेल्या सात दिवसातील वातावरण कमालीचे गरम झाले आहे. २३ एप्रिलच्या रात्री तरोडी शिवारात माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांचा मुलगा नरेंद्र हरिणखेडे याची रुपसिंग सोळंकी नामक आरोपीने अनैतिक संबंधातून हत्या केली. २६ एप्रिलला कुख्यात गुंड रवी पावस्कर याची आकाश देशभ्रतार आणि आकाश मंडल या दोघांनी निर्घृण हत्या केली. हे हत्याकांडही अनैतिक संबंधातूनच झाले. २८ एप्रिलच्या मध्यरात्री नंदनवन पोलिसांनी सव्वातीन कोटींची हवाला रोकड पकडली. या संबंधाने रविवारी दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू असताना रविवारच्या मध्यरात्रीनंतर हे हत्याकांड घडले.