नागपूर: शहरात दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १:२४ वाजता वॉकहार्ट हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर नागपूर वाहतूक पोलिसांनी MH 20 DZ 5061 नंबर असलेल्या वाहनाची तपासणी केली असता, संबंधित वाहनावर बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत मूळ वाहनधारकाचा शोध घेतला. तपासाअंती उघड झाले की, खरे MH 20 DZ 5061 हे वाहन अन्य ठिकाणी उपस्थित होते.
यावरून पोलिसांनी बोगस नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करत MH 31 EX 9993 नंबर असलेले वाहन ताब्यात घेतले. सदर वाहन चालवणारा हरिश तिवारी याने जाणीवपूर्वक दुसऱ्या वाहनाचा नंबर आपल्या गाडीवर लावल्याचे समोर आले.
पोलिस तपासात आत्तापर्यंत एकूण ८ वाहने बनावट नंबर प्लेटसह आढळून आली आहेत. संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित सांबरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना दिसून आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. बनावट नंबर प्लेट लावणे हा गंभीर गुन्हा असून याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.