नागपूर : शहरात पोलीस आयुक्तपदी कार्यभार हाती घेतल्यानंतर रविंद्र सिंगल ॲक्शन मोडवर आले आहे. सिंगल यांच्या उपस्थितीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकून ३१७ गुन्हेगारांची आयुक्तालयाच्या मैदानात परेड घेण्यात आली. सर्व गुन्हेगारांशी आयुक्तांनी स्वत: संवाद साधला. त्यांना सुधरण्याची शेवटची संधी दिली. यानंतर एकाही गुन्हेगारांचा एखाद्या अवैध कृत्य किंवा गुन्ह्यांशी संबंध आल्यास त्या गुन्हेगाराची खैर केली जाणार नाही, असा इशाराही रविंद्र सिंगल यांनी दिला.
दरोडा, खंडणी आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले गुन्हेगार यावेळी उपस्थित होते. भविष्यात कायदा हातात घेऊन गुन्हा केल्यास परिणाम भोगण्यास तयार राहण्याचा इशारा देण्यात आला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या परेडमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली.
पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डॉ. सिंगल हे कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचा आढावा घेण्यात व्यस्त आहेत. त्यांनी सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील सक्रिय व कुख्यात गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात परेड करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे अधिकारी आपापल्या भागातील ३१७ गुन्हेगारांसह पोलीस आयुक्तालयात पोहोचले.
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सहाय्यक आयुक्त अस्वती दोरजे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित गोयल, डीसीपी आणि संबंधित झोनचे एसएचओ यांच्या उपस्थितीत प्रत्येक गुन्हेगाराशी वैयक्तिकरित्या संवाद साधला.
पोलीस आयुक्तांकडे असणार गुन्हेगारांची ‘डेटा बँक’:-
पोलिसांकडून नागपुरातील प्रत्येक गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात आली आहे. गुन्हेगारांचे छायाचित्र, फिंगर प्रींट आणि कोणत्या गुन्ह्यांशी संबंध आहे, किती गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीची ‘डेटा बँक’ पोलीस आयुक्तांनी तयार केली. ३१७ गुन्हेगारांचीही संपूर्ण माहिती पोलिसांना गोळा केली आहे. भविष्यात गुन्हा घडल्यानंतर सर्वप्रथम डेटा बँकेची तपासणी करण्यात येईल,असे नियोजन करण्यात आले आहे.
अवैध वसूली करणाऱ्या सावकारांच्या विरोधात मोहिम उभारणार –
नागपुरात सुरु असलेला हवाला व्यवसाय आणि क्रिकेट बेटिंग,अशा गंभीर गुन्ह्यांकडे पोलिसांचे लक्ष असेल. ड्रग्स, गांजा, अमली पदार्थ विक्री,अवैध दारू विक्री, जुगार, मटका या प्रकरणातील गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. अवैध सावकारांची यादी तयार केल्या जाईल. अवैध वसूली करणाऱ्या सावकारांच्या विरोधात मोहिम सुरू करण्यात येईल. शहरात प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्यास सोडणार नाही, असेही सिंगल म्हणाले.