नागपूर : बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी महत्त्वाच्या टप्प्यातील ताणतणावावर मात करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना प्रेरणादायी संदेश दिला आहे. सिंगल यांनी पत्रातून दिलेल्या संदेशाचा उद्देश परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि एक आश्वासक वातावरण निर्माण करणे आहे. तसेच पालकांनाही सिंगल यांनी मोलाचा संदेश दिला.
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचे पत्र-
बारावीच्या बोर्ड परीक्षा जवळ आल्या आहेत. या महत्वाच्या टप्प्यावर, भी एक अधिकारी म्हणून नाही, तर तुमच्या भावनांना समजून घेणारा एक शुभचिंतक म्हणून काही अनुभव तुमच्यासोबत सांगू इच्छितो. विद्यार्थ्यांनो, परीक्षा जवळ येताच तुम्ही तणावाखाली येऊ शकता. तुम्ही संपूर्ण वर्ष मेहनत घेतली आहे, पण परीक्षेची तारीख जसजशी जवळ येते, तसतशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. काही वेळा असे वाटू शकते की आपण सगळं विसरुन गेलो आहोत किंवा परीक्षेच्या वेळी काहीच आठवणार नाही. पण मी तुम्हाला खात्री देतो हे अनेक विद्यार्थ्यांसोबत घडते आणि याचा अर्थ असा नाही की तुमची तयारी अपूर्ण आहे किंवा तुम्ही काहीही विसरले आहात.
जर तुम्हाला तणाव जाणवत असेल, तर खोल श्वास घ्या आणि स्वतः ला आठवण करुन द्या की तुम्ही सक्षम आहात. या वेळी विजुअलायझेशन तंत्राचा उपयोग करु शकता. डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्ही आत्मविश्वासाने परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करत आहात. परीक्षेचे वातावरण अनुभवत आहात. तुम्हीं तुमच्या जागेवर बसला आहात. प्रश्नपत्रिका हातात आली आहे. तुम्ही ती शांतपणे वाचत आहात आणि काही क्षणांत आत्मविश्वासाने उत्तर लिहू लागला आहात. तुम्हाला सगळं आठवत आहे.अशा सकारात्मक विचारसरणीमुळे तुमचा मनोबल वाढेल आणि परीक्षेत तुमचा परफॉर्मन्स चांगला होईल.
जेव्हा तुम्ही पहिला पेपर देऊन बाहेर याल, तेव्हा तुम्हाला नक्की जाणवेल की तुमची भीती कमी झाली आहे . तुमचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रत्येक प्रश्न नीट वाचा, सावधपणे उत्तरे लिहा, आणि वेळ मिळाल्यास तुमची उत्तरपत्रिका एकदा तपासा. कधीकधी लहान सुधारणा देखील मोठा फरक घडवू शकतात.
तसेच पालकांसाठी सिंगल म्हणाले की, परीक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर पालकांसाठीही एक भावनिक टप्पा असतो. तुम्ही तुमच्या मुलांना संपूर्ण वर्षभर सहकार्य केले आहे, त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आता, या शेवटच्या क्षणांत, त्यांना तुमच्या आधाराची अधिक गरज आहे. त्यांना हे जाणवू द्या की परीक्षा हा फक्त जीवनाचा एक टप्पा आहे, अखेरवा निकाल नव्हे.
मी अनेक असे विद्यार्थी पाहिले आहेत, जे शालेय जीवनात सरासरी दर्जाचे होते, पण नंतर त्यांनी आयुष्यात अपूर्व यश मिळवले. आजच्या काळात अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रत्येकाची गुणवत्ता वेगळी असते. त्यामुळे मुलांवर अतिरिक्त तणाव न आणता, त्यांचा आत्मविश्वास वाठ्या आणि त्यांना समजून घ्या.
सर्व विद्यार्थ्यांना माझा संदेश आहे की, तुम्ही परीक्षेत सर्वोत्तम प्रयत्न करा, पण है विसरू नका की कोणतीही परीक्षा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय ठरवत नाही. यश हा एक प्रवास आहे, आणि ही परीक्षा त्या प्रवासातील केवळ एक पायरी आहे. आत्मविश्वास ठेवा, संयम ठेवा आणि नेहमी तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. तुमच्या परीक्षांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा, असे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी पत्रात लिहिले.