नागपूर – शहरातील अलीकडच्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार अंबाझरी आणि कापिलनगर पोलीस ठाण्यांतील तपास पथकातील अधिकाऱ्यांना तत्काळ बरखास्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि पोलिस यंत्रणेत शिस्त राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
२३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. कापिलनगर येथे १९ एप्रिल रोजी खून, तसेच अंबाझरीत १६ मार्च रोजी पांढराबोडी परिसरात खून आणि १५ एप्रिल रोजी गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनांनंतर पोलिस आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही ठाण्यांतील निष्क्रिय व दुर्लक्ष करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना बरखास्त केले असून, त्यांच्या जागी अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन अधिकारी आणि तपास पथकांना त्यांच्या क्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. पोलिस ठाण्यांची कार्यक्षमता सातत्याने तपासली जाणार असून, यापुढेही आवश्यकतेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.