नागपूर: 13 महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शहरी आणि ग्रामीण भागातून निवड झालेल्या फौजदारांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कठीण परीक्षेतून निवड झालेला हा युवा वर्ग आता पोलीस विभागात कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झाला आहे. एकूण 620 फौजदारांची सत्र क्रमांक 124 ची तुकडी, ज्यांनी आंतरवर्ग आणि बाह्य वर्ग परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्या त्यांचा दीक्षांत सोहळा 20 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे मोठ्या थाटात पार पडला.
या परीक्षेचे महत्त्व अनन्य साधारण आहे.कारण या परीक्षेतील रँकिंगवर त्यांचे भविष्यातील प्रमोशन अवलंबून असते. यावेळी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात सदर तुकडीतील मेरिटनुसार पहिले 92 फौजदार नागपूर रुजू झाले आहेत.
नागपुरात पोलीस विभागात सदर फौजदारांचे स्वागत करत मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन आज
पोलीस भवन,कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले. नव्या फौजदारांचे स्वागत व त्यांना कर्तव्याची जाणीव करून देणे, हा या बैठकीचा उद्देश होता.
पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, फौजदार हे पोलीस ठाण्याचा कणा आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, देखरेख करणे, लोकांना मार्गदर्शन करणे, तपास करणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या 92 फौजदारांना पोलीस आयुक्तांनी ‘पालका प्रमाणे मार्गदर्शन केले.
पोलीस आयुक्तांनी नव्या फौजदारांच्या प्रशिक्षणाची प्रशंसा करत हेही नमूद केले की, आपली बॅच भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम या नव्या कायद्यांचा सखोल अभ्यास करणारी महाराष्ट्रातील 1 ली बॅच आहे. त्यामुळे या कायद्यांचा योग्य वापर पोलीस स्टेशन पातळीवर करण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.
पोलीस स्टेशनमध्ये काम करताना फील्ड वर्कला प्राधान्य द्यावे. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत सुसंवाद साधून काम करावे. प्रत्येक जबाबदारीला संधी म्हणून स्वीकारावे. तसेच, बदली किंवा इतर त्रासदायक बाबींबद्दल नाराजी व्यक्त न करता, नागपूर शहरात काम करण्याच्या संधीचा सकारात्मक उपयोग करावा.
नागपूर शहर हे केवळ भौगोलिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक, आणि राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचे शहर आहे. येथे महत्त्वाचे राजकीय नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी, आणि अनेक महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे काम करताना प्रत्येक फौजदाराने प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सहानुभूतीने कार्य केले पाहिजे.पोलीस आयुक्तांनी आर्थिक नियोजनाबाबत देखील मार्गदर्शन केले. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक शिस्त पाळल्यास सेवानिवृत्तीपर्यंत आर्थिक स्थैर्य टिकून राहते.
नव्याने दाखल झालेल्या फौजदारांकरिता सायबर क्राइम, फॉरेन्सिक सायन्स, मकोका, एमपीडीए, आणि अत्याधुनिक ‘सिंबा’ कार्यप्रणाली यावर तीन दिवसांचे विशेष ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित करण्याचे निर्देश अधिनिस्त अधिकारी यांना दिले.
पोलीस आयुक्तांनी फौजदारांना शिस्त आणि जबाबदारी यांची जाणीव करून दिली. समाज माध्यमांवर कोणतीही चूक क्षणात प्रसारित होऊ शकते आणि त्याचा पोलीस दलाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक फौजदाराने शिस्तबद्ध आणि काटेकोर कार्यपद्धती अवलंबावी.पोलीस आयुक्तांनी सर्व फौजदारांना त्यांच्या छंद, खेळ, फिटनेस याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. कारण छंद जोपासल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते, ज्याचा सकारात्मक परिणाम कामावर होतो. सदर बैठकीत प्रत्येक फौजदाराचा बायोडेटा, विशेष कौशल्ये, शिक्षण, आवड, छंद, स्पोर्ट्स कौशल्य, डिप्लोमा किंवा अन्य वैशिष्ट्ये यांची नोंदणी करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शेवटी, पोलीस आयुक्तांनी सर्व नव्या फौजदारांना त्यांचा परिविक्षाधीन कालावधी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या बैठकीत अपर पोलीस आयुक्त संजय पाटील (गुन्हे) आणि पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी देखील फौजदारांना मार्गदर्शन केले.
सदर बैठकी नंतर नवीन फौजदार यांनी नमूद केले की, सदर बैठक ही त्यांच्यासाठी फक्त स्वागतच नव्हे, तर एक प्रेरणादायी पाऊल देखील आहे. पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास व जबाबदाऱ्या व अपेक्षांची जाणीव आम्हाला आहे. ज्याप्रमाणे इमारतीचा पाया भक्कम असेल तर ती टिकाऊ व दीर्घ काळ चालते याच धर्तीवर सदर फौजदार हे त्यांच्या नोकरीतला १ ला दिवस ते निवृत्तीचा शेवटचा दिवसा पर्यंत पोलीस आयुक्तांनी केलेला उपदेश हा त्यांना लक्षात राहील असे प्रतिपादन नवीन फौजदारांनी केले.