नागपूर : शहरातील भूमाफिया आणि अवैध सावकारांविरोधात नागपूर पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात सोमवारी पीडितांना तक्रार देण्यासाठी सिव्हिल लाईन्स येथील पोलीस भवनात सामूहिक जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या तक्रारी घेऊन तेथे पोहोचलेल्या तक्रारदारांची संख्या पाहून खुद्द पोलिस आयुक्तांनी भविष्यातही अशी शिबिरे सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. पाच परिमंडळांतर्गत शहरातील सर्व 33 पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान अवैध सावकारीचे जाळे उपराजधानीतील गल्लीबोळापासून पॉश बंगल्यांपर्यंत आणि छोट्या टपरीवाल्यांपासून तो मोठमोठे व्यवसाय करणारांपर्यंत सर्वांच्या अवतभवती विणलेले दिसते. जशी व्यक्ती, तसा सावकार आणि जशी गरज तशी कर्जाची रक्कम असे या सावकारीचे स्वरूप आहे. त्यामुळे अनेक नागरिक दहशतीत आहेत.