नागपूर /गोंदिया : बनावट ऑनलाईन गेमींग अॅपच्या माध्यमातून व्यापाऱ्याची ५८ कोटींनी फसवणूक करणाऱ्या अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन प्रकरणात नवनवीन खुलासे बाहेर येत आहे. आरोपी सोंटू याच्या गोंदियातील काका चौक, सिव्हिल लाइन्स येथील घर आणि दुकानावर नागपूर गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पथकाने छापेमारी केली. सोंटूच्या घराची झडती घेत असताना पोलिसांनी जमीन मालमत्तेसंदर्भातील काही महत्त्वाची दस्तऐवज जप्त केली आहेत.
गुरुवारी रात्री साडेआठ वाजता गुन्हे शाखेचे पोलिस पथक सौंटू जैन यांच्या दुकानातील नोकरांसह गोरेलाल चौक, श्री टॉकीज चौक या मुख्य रस्त्यावर असलेल्या ‘कुर्ता वाला’ नावाच्या दुकानात पोहोचले. या दुकानाची रात्री साडेअकरा वाजेपर्यंत झडती घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकी अनंत उर्फ सौंटू जैन याने नागपूरच्या कनिष्ठ न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. सखोल चौकशीअंती काही नावे समोर आली, ज्याच्या आधारे सौंटू जैनचे मित्र डॉ. गौरव बग्गा यांचे नाव समोर आले.
यानंतर नागपूर पोलिसांनी या दाम्पत्याच्या घरावर छापा टाकला तेथून मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले. इतकेच नाही तर अॅक्सिस बँकेतील सोंटू जैनच्या लॉकरमधून रोख रक्कम आणि सोने इतर तीन लॉकरमध्ये नेल्याप्रकरणी बँक व्यवस्थापक अंकेश खंडेलवाल यालाही पोलिसांनी अटक केली. सोंटू जैनला पळून जाण्यात मदत करणाऱ्या आणखी एका तरुणाचीही सविस्तर माहिती असून, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुने बस स्टँड रोडवरील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या लॅविश हॉटेलवरही पोलिसांनी दरोडा टाकला.या हॉटेलचीही झडती घेतल्याची माहिती समोर येत आहे. गोंदियातील काही व्हाईट कॉलर चेहऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, या छाप्यात कोणत्या वस्तू जप्त केल्या आहेत, याचा सविस्तर खुलासा नागपूर पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी लवकरच करणार आहेत.