नागपूर: शहरात नायलॉन मांजामुळे कोणालाही इजा होऊ नये यासाठी पोलिस विभागाने युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या नेतृत्त्वात झोन 5 चे डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 18 लाख रुपयांचा नायलॉन मांजा रोलरने नष्ट करण्यात आला आहे.
मकर संक्रांती सणाच्या पूर्वसंध्येला जरीपटका पोलीस ठाण्याच्या इंदोरा मैदानात झोन 5 अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेला मांजा नष्ट करण्यात आला.”Say No To Nylon Manja” असा संदेश यावेळी नागपूर पोलिसांनी जनतेला दिला आहे.
दरम्यान मकरसंक्रांतीचा सण नागपूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, आता पतंग उडवण्यासाठी बंदी असतानाही वापरल्यानं, नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.
गेल्या महिन्याभरात नागपूर जिल्ह्यात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरात पोलीस प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री सुरूच असल्याने नागपूर पोलिसांनी आता कंबर कसली आहे.