नागपूर – शहरात उष्णतेचा कहर वाढत असतानाच, तीन अज्ञात व्यक्तींचा ऊष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील वेगवेगळ्या भागांत ही प्रकरणे घडली असून, तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना २२ एप्रिल रोजी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शितला माता मंदिराजवळ एका अंदाजे ४५ ते ५० वर्षाच्या पुरुषाला बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्याला GMCH रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दुसरी घटना २० एप्रिल रोजी दुपारी अग्रसेन चौकात समोर आली. सुमारे ५० वर्षाचा एक पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याचा उपचारादरम्यान २१ एप्रिलच्या पहाटे मृत्यू झाला. हा प्रकार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
तिसरी घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता गांधी बाग कापड बाजार परिसरात घडली. तिथे सापडलेल्या अंदाजे ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीला मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सर्व मृतदेहांवर कोणतीही जखम दिसून आली नसल्याने ऊष्माघाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. मृतांची ओळख पटवण्याचे आणि मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.