Published On : Tue, Mar 16th, 2021

लॉकडाऊनला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; पोलीसांचा कडक बंदोबस्त

Advertisement

प्रशासनाला सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन, अत्यावश्यक असेल तरच नागपूर शहरात प्रवेश करा, कोरोना रुग्ण संख्येत वाढ कायम ; सोमवारची २ हजार २९७ संख्या

नागपूर : कोरोनाचा वाढता आलेख बघता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन नागपूर शहरात लागू करण्यात आला असून आज पहिल्याच दिवशी संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुढील २१ मार्चपर्यंत कोरोना वाढीची श्रृंखला तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

Gold Rate
Friday 28 March 2025
Gold 24 KT 89,400 /-
Gold 22 KT 83,100 /-
Silver / Kg 101,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१५ ते २१ च्या लॉकडाऊनमध्ये नागपूर लगतच्या कामठी शहरातील जुने व नवीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावे, हिंगणा, सोनेगाव, कोराडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण हद्दीमध्ये आज संचारबंदी कायम होती .शहरात पोलीसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. नागरिकांनी या संचारबंदीस सकारात्मक प्रतिसाद दिला.

शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, धार्मिक व राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, शहरातील सभागृह, मंगल कार्यालये, लॉन या ठिकाणी होणारे लग्नसभारंभ, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह, जलतरण तलाव, मॉल्स, चित्रपटगृह नाट्यगृह, खाजगी आस्थापना, दुकाने मार्केट, उद्याने, व्यायामशाळा, जिम, दारु दुकाने आदी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता.

मात्र अत्यावशक सेवा वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स, वृत्तपत्र मीडियासंदर्भातील सेवा, भाजीपाला, दुधविक्री व पुरवठा, फळविक्री, कोरोनाविष्यक लसीकरण सेवा व चाचणी केंद्र, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, मालवाहतूक सेवा, किराणा दुकाने, चिकन मटन अंडी, मांस दुकाने, पशुखाद्य दुकाने, खते, बी-बियाणे आदी सुरु होते. सर्वत्र या बंदला सकारात्मक प्रतिसाद नागपूरकरांनी दिला.


तथापि, शहरातील रुग्णसंख्याच्या वाढीचा आलेख कायम असून सोमवारी 1933 रुग्ण शहरात आढळले तर ग्रामीण भागात 361 रुग्ण पुढे आलेत. अन्य जिल्ह्यातील तीन रुग्ण मिळून सोमवारची एकूण संख्या 2297 झाली आहे. ही आकडेवारी धोक्याचा इशारा देणारी असून पुढील सात दिवस नागरिकांनी सहकार्य कायम ठेवून रुग्णसंख्येची वाढ कमी करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे स्पष्ट करण्यात आले असून ज्यांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे आहे त्यांनी आपल्यासोबत ओळखपत्र ठेवावे. तसेच लसीकरण करण्यासाठी ज्येष्ठांना बाहेर पडायचे असेल त्यांनीदेखील आपले ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन केले आहे. या काळात लसीकरणामध्ये कोणताही खोळंबा नसून लसीकरणाचा लाभ सर्वांनी घेण्याबाबतही प्रशासनाने सूचित केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी गंभीर वैद्यकीय कारण किंवा अत्यावश्यक कार्य असल्याशिवाय नागपूर शहरांमध्ये शक्यतो प्रवेश करू नये. ज्या कारणांसाठी प्रवेश करायचा आहे त्यासंदर्भातील कागदपत्रे व ओळखपत्रे सोबत बाळगणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांशी वाद न घालता आवश्यक कामाची कागदपत्रे ठेवावी. ओळखपत्रे सोबत ठेवावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री
नागपूर शहरामध्ये दररोज वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 ते 21 मार्च या दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आज पोलीस आयुक्तालय परिसरातील या लॉकडाऊनला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पुढील सात दिवस अशाच प्रकारे घराबाहेर न पडता कोरोना सोबत लढा द्यायचा आहे. जेणेकरून ही परिस्थिती कायम राहणार नाही. यासाठी ‘मी जबाबदार ‘, म्हणत प्रत्येकाने कोविड प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, कोरोनाचे रुग्ण अधिक वाढल्यास लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्यासाठी निर्बंध अधिक कठोर करावे लागतील. त्यामुळे पुढील काळात लॉकडाऊनची सक्ती वाढू नये यासाठी सर्वांनी या सात दिवसात प्रशासनाला साथ देणे आवश्यक आहे. नागपूरकर जनतेने पहिल्याच दिवशी या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या सर्व सूज्ञ नागरिकांचा आभारी आहे. मला माहिती आहे की, व्यापारी, दुकानदार, याशिवाय किरकोळ विक्रेते हातावर पोट असणारे अनेक छोटे व्यावसायिक यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत कठीण आहे. मात्र जीवित्वाच्या पुढे आपण सर्व हतबल असून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ही उपाययोजना आहे. सध्या संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार जिल्ह्यात काम सुरू आहे. चाचण्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. दुसरीकडे लसीकरण देखील अतिशय वेगाने सुरू आहे. त्यामुळे आपण सहकार्य कराल,अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

समाजमाध्यमांवरील त्या पोस्ट फसव्या आर्थिक मदतीचे आमिष : नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात समाजकंटकांनी ‘सोशल मीडियाद्वारे फसव्या पोस्ट टाकून नागरिकांना आमिष देणे सुरु केले आहे. या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन केले आहे.

1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ज्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले, त्या व्यक्तीच्या विधवेला महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जिजामाता/जिजाऊ या योजनेतंर्गत 50 हजार रुपये मदत मिळणार असल्याची पोस्ट ‘व्हाट्स-ॲप’ वर फिरत आहे. मात्र हा संदेश पूर्णत: चुकीचा बनावट असून अशी कुठलीच योजना विभागामार्फत कार्यान्वित नाही, असे महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्तांनी 10 मार्च रोजी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. वेगाने ‘व्हायरल’ होत असलेल्या अशाप्रकारच्या संदेशामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement