नागपूर – शहरातील महल आणि हंसापुरी परिसरात १७ मार्चला झालेल्या दंगलीचा मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम खानला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी त्याला अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
१७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर महल आणि हंसापुरी भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. पोलिसांनी फहीम खानला या दंगलीचा मुख्य सूत्रधार ठरवले आहे. यापूर्वी त्याच्यावर सायबर पोलिस ठाण्यात देशद्रोहासह इतर गुन्ह्यांखाली केस नोंदवण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
हंसापुरीतील वाहनांची तोडफोड, जाळपोळ आणि दंगल प्रकरणी तहसील पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातही फहीम आरोपी असल्यामुळे तहसील पोलिसांनी न्यायालयात त्याच्या अटकेसाठी अर्ज केला होता. प्रॉडक्शन वॉरंट घेत गुरुवारी दुपारी फहीमला नागपूर सेंट्रल जेलमधून अटक करण्यात आली.
शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलिस ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचे दुसरे नेते हमीद इंजिनीअर यांचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. फहीम खाननंतर हमीदलाही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फहीमने एका प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर ८ एप्रिलला सुनावणी होणार आहे.