नागपूर :आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) एजंटकडून खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकाराला सदर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती.सुनील सुकलाल हजारी (44) असे आरोपी पत्रकाराचे नाव असून ते एका नामी वृत्तपत्रात चीफ एडिटर म्हणून काम करतात. हजारी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 1 सप्टेंबर पर्यंत वाढ केली आहे,पीएसआय घोटे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
न्यायाधीश एच.एस. उके यांच्या समक्ष या याप्रकरणी सुनावणी झाली.अधिवक्ता रणजित सरडे आणि अधिवक्ता श्रीराम देवास यांनी सहाय्यक खटला चालवला.पीएसआय घोटे यांनी सांगितले की, हजारी यांनी खंडणीत घेतलेले एक लाख रुपये त्यांच्या घरातून हस्तगत करायचे आहेत. याप्रकरणी इतर तक्रारदार आहेत ज्यांना सुनील हजारी यांच्याबद्दल तक्रार करायची आहे.
आरटीओतील एजंट धनराज ऊर्फ टिटू शर्माने (५५, बाबादीपसिंहनगर) याने दिलेल्या तक्रारनुसार पत्रकार हजारी याला खंडणी घेतांना अटक करण्यात आली. शर्मा अनेक वर्षांपासून ग्रामीण आरटीओशी जुळला आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओमधील एका प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात संबंधित शर्माची काय भूमिका आहे याबाबत हजारीने वृत्त प्रकाशित केले होते.याच प्रकरणातील बातमी प्रसिद्ध न करण्याच्या बदल्यात आरोपीने संबंधित शर्माला १० लाखांची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर सात लाखांत डील झाली. २८ ऑगस्ट रोजी शर्माने त्याला एक लाखांचा पहिला हप्ता दिला होता. मात्र, त्यानंतर पैसे देण्याची इच्छा नसल्याने शर्माने सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. उपायुक्त राहुल मदने यांच्या निर्देशांवरून सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. गुरुवारी आरोपी हजारी ८० हजार रुपये घेण्यासाठी व्हीसीए स्टेडियमजवळील चहाच्या टपरीजवळ पोहोचला. तेथून दोघे एका आईसक्रीमच्या दुकानात गेले. तेथे पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली. पत्रकाराने पोलिसांशी अरेरावी करण्याचादेखील प्रयत्न केला. रात्री नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.