नागपूर: राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) स्कुल बसेस करिता २७ मानक तयार केले आहेत. परंतु वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (वेकोलि) मध्ये मात्र चक्क स्टाफ बसेसचे रूपांतर स्कुल बसमध्ये करून चालवले जाते. हा गोरखधंदा नुकताच नागपूर टुडेने उघडकीस आणला होता. तेव्हापासून स्कुल बस चालक बसमवेत फरार असून परिवहन विभाग आणि वेकोलि मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. दरम्यान या प्रकरणी मोठा गैरवव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत असून दोन्ही विभागणी उचित कारवाई न केल्यास सदर प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वेकोलिच्या उत्तर वाणी क्षेत्राने एक महिन्यापूर्वी खाणीत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी स्कुल बसची निविदा काढली होती. त्यानुसार परिवहन विभागाची २७ मानकांसमवेतच सदर बसमध्ये ५४ आसने व चढउतार करण्यासाठी अतिरिक्त पायऱ्या असणे अनिवार्य आहे.
गोंदिया येथील प्रसिद्ध बालाजी ट्रॅव्हल्सचे मालक गुप्ता यांनी सदर स्कुलबसची निविदा जिंकण्यासाठी वेकोलीमधील संबंधितांच्या सांगण्यावरून पत्नीच्या नावावर व्यंकटेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स या खोट्या कंपनीची कागदपत्रे जमा केली.
निविदा मिळाल्यानंतर परिवहन विभागाच्या नियम व मानकांचे पद्धतशीर उल्लंघन सुरु झाले. या स्कुल बसमध्ये ५४ ऐवजी ५१ आसने होती. तसेच बसच्या खिडक्यांवर नियमांप्रमाणे ४ ऐवजी केवळ दोनच आडवे लोखंडी गज होते. तर सदर बसची विक्रेती कंपनी जायका मोटर्सचे म्हणणे आहे कि गुप्ता (बालाजी ट्रॅव्हल्स गोंदिया) यांनी ७-८ महिन्यांपूर्वी एक स्टाफ बस विकली होती.
ही बस क्रमांक एमएच ३५ एजे -०२७२ गोंदिया आरटीओ मध्ये नोंदणीकृत आहे. तर गोंदिया आरटीओने स्कुल बससाठीच्या २७ मणक्यांची चाचपणी केली का, हे कोडे आहे. त्याचप्रमाणे माहिती अधिकार कार्यकर्ता अबिद हुसेन जाहिद हुसेन यांच्या मते या बसचा परवाना बनावट आहे. तसेच उत्तर वणी वेकोलि क्षेत्राचे अधिकाऱ्यांचे बसच्या मालकाशी संगनमत असल्याचे ते म्हणाले. या बसमध्ये प्रथमोपचार आणि अग्निशामक उपाययोजना सुद्धा नाहीत. या प्रकारची कल्पना हुसेन यांनी डीवायएसपी कार्यालयाला देऊन बस जप्त करण्याची मागणीकेली असता बस चालकाच्या सूचनेनंतर गुप्ता याने या बसला वाणीवरून गोंदियाला माघारी बोलावले. याचे सीसीटीव्ही फुटेज वरोरा येथील टोल प्लाझामध्ये उपलब्ध आहे.
ताज्या माहितीप्रमाणे गुप्ता आता नियमांप्रमाणे दुसरी वैध बस पाठवून कागदी हेरफेर करणार असून हे प्रकरण रफादफा न करण्याचा इशारा हुसेन यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यांनी यासंदर्भात शुक्रवारी उत्तर वाणी वेकोलिच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन दोषी अधिकारी आणि बस मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.