नागपूर : जबलपूर येथून संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या भाजप नेत्या सना खान यांची हत्या झाल्याचे निश्चित झाले आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याला मानकापूर पोलिसांनी जबलपूर येथून अटक केली आहे. एक दिवसापूर्वीच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून याप्रकरणी एक पथक जबलपूरला पाठवले होते. त्याचवेळी चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली आहे.
1 ऑगस्ट रोजी सना खान जबलपूरला रवाना झाली होती. 2 ऑगस्ट रोजी येथे पोहोचल्यानंतर तिने आईला जबलपूरला पोहोचल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. पुन्हा फोन केल्यावर कुणीच फोन उचलला नाही. सनाचा नवरा अमितही त्याच दिवसापासून बेपत्ता होता. यानंतर सनाच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेले. यावेळी पोलिसांनी आरोपी पप्पू साहूच्या ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरला अटक केली.
मात्र, या प्रकरणात पोलीसही सीमा वादाच्या भोवऱ्यात सापडले. नागपूर पोलिस आणि जबलपूर पोलिसांची अनिर्णय वृत्तीही दिसून आली.
शुक्रवारी सकाळी पप्पू साहूला पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले. महत्त्वाचं म्हणजे चौकशीदरम्यान त्याने सना खानची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी पप्पू साहूच्या कारमध्ये रक्ताने माखलेले कपडे सापडल्याची माहिती देणाऱ्या त्याच्या एका नोकराला अटक केली होती. नागपूर पोलिसांसह जबलपूर पोलिस आता सना खानच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. चौकशीत पप्पू साहूने या खून प्रकरणातील त्याच्या आणखी एका साथीदाराचे नावही सांगितले असून, त्याचाही शोध सुरू आहे.
सना खानने चार महिन्यांपूर्वी आरोपी सुमित उर्फ पप्पू शाहूशी लग्न केले होते. आरोपीचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी त्याचे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी लग्न झाले होते, मात्र आरोपीचे चुकीचे कृत्य पाहून त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला. त्याने याच वर्षी एप्रिलमध्ये सनासोबत लग्न केले.