नागपूर : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेल्या संपापाठोपाठ आज नागपुरातील स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनी संपात सहभागी होत एकदिवसीय बंद पुकारला आहे. यामुळे मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची एकच तारांबळ उडाली.
या एकदिवसीय संपामध्ये नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील 3 हजाराहून आधिक स्कूल बस आणि 700 हून अधिक स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले आहेत. आधीच शहरात पेट्रोल टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, आता नव्याने उद्भवलेल्या या समस्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.
देशभरातच मालवाहतूकदार, टँकर चालकांचा संप सुरू असल्याने राज्यासह देशात अनेक ठिकाणी अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलपंप इंधनाअभावी ओस पडले होते. तर, पेट्रोल भरून घेण्यासाठी नागपुरात ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.