नागपूर : नाशिक – मुंबई महामार्गाचे काम करणाऱ्या सुप्रीम इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला काळ्या यादीत टाका अशी मागणी शिवसेना आमदारांनी आज विधानसभेबाहेर घोषणाबाजी करत केली.
याबाबत अधिक माहिती देतांना भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे यांनी सांगितले की, मुंबई – नाशिक महामार्गाचे संपूर्ण काम सुप्रीम इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीने स्वतःच्या लाभासाठी निकृष्ट पद्धतीचे बांधकाम केले. गेल्या सात वर्षांपासून हे काम रखडले असून, त्याचा या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
हे काम ज्या कंपनीला सोपवले, त्या सुप्रीम इन्फ्रास्टक्चर कंपनीकडून हे काम काढून दुसºया कंपनीकडे सोपवावे अशी मागणी यावेळी आमदारांनी केली. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला तीनदा मुदतवाढ देण्यात आली होती. कंपनीच्या कामाचा दर्जाही निकृष्ट प्रतीचा असून, त्या कंपनीने अशी अनेक कामे अर्धवट सोडल्याकडेही आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले.
या कंपनीला सरकारने ब्लॅकलिस्ट करावे व तिच्यावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा यावेळी आमदारांनी दिला.