नागपूर:मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली. नागपुरातही ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली असून सुमुख मिश्रा नावाच्या टायगरने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वर्धा रोडवरील एअरपोर्ट हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात हा पक्षप्रवेश सोहळा रंगला होता. मिश्रा यांनी शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनात शिवसेना नेते कृपाल तुमाने, संजय राठोड आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले.
फायर ब्रँड नेते म्हणून सुमुख मिश्रा यांची ओळख- काँग्रेसच्या एनएसयूआयचे माजी अध्यक्ष सुमुख मिश्रा हे एक फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सामाजिक कामे केली आहेत. तसेच अन्याय विरोधात आवाज उचलला आहे. सुमुख मिश्रा हे एकेकाळी शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांचे कार्यकर्ते होते. त्यानंतर ते काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांच्या गटात गेले. ते युवक काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा होते. नागपूर विद्यापीठाच्या विरोधात मिश्रा यांनी मोठे आंदोलन केले होते. या दरम्यान त्यांनी कुलगुरुंची खुर्ची बळकावून त्यावर ठाण मांडले होते. त्यामुळे मिश्रा यांच्या आंदोलनाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती.
अभिनेते शक्ती कपूर यांना फासले काळे – सुमुख मिश्रा हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. कास्टिंग काऊच प्रकरणात अभिनेता शक्ती कपूर यांच्या तोंडाला काळे फासण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
नागपुरात शिवसेनेची ताकद वाढवणार –
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केल्यानंतर सुमुख मिश्रा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवबंधन हाती बांधल्यानंतर आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे मिश्रा म्हणाले. मिश्रा यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश झाल्यानंतर नागपुरात काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.