नागपूर: नागपूर शहराने नेहमीच इतिहास जतन करण्याचा प्रयत्न केला. नागपुरात चांगले रस्ते, चांगले पूल, चांगल्या शैक्षणिक सोयी आहेत. आता भविष्यात नागपूर ही पुण्यासारखीच राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून उदयास यावी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शिवाजी नगरातील शिवाजी उद्यानात नागपूर महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, खा. अजय संचेती, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रा. अनिल सोले, प्रभाकरराव मुंडले, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, मनपाच्या स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेवक सुनील हिरणवार, उज्ज्वला शर्मा, बच्चू मुंडले, शिवाजीनगर नागरिक मंडळाचे निखिल मुंडले उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, नागपूर महानगरपालिका खऱ्या अर्थाने नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे. विवेकानंद स्मारक, नामांतर लढ्यातील शहीदांचे स्मारक, कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूरसाठी सांस्कृतिक वैभव ठरत आहेत. आता नागपुरात राष्ट्रीय स्तरावर कुठलीही कॉन्फरन्स होऊ शकेल अशा सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच नागपूरचा सांस्कृतिक राजधानी म्हणून उदय होईल.
शिवाजीनगरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने खऱ्या अर्थाने आता नगराचे नाव सार्थक झाले आहे. आता या उद्यानात एखादे स्क्रीन लावून सायंकाळी खेळायला येणाऱ्या मुलांना थोर-महात्म्यांचे चरित्र दाखविल्यास बालमनावर चांगले संस्कार पडतील, असेही ते म्हणाले.
आ. सुधाकर देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून सभापती संजय बंगाले यांनी कार्यक्रमागची पार्श्वभूमी विषद केली.
तत्पूर्वी ना. नितीन गडकरी, ना. चंद्रशेखर बावनकुळे व उपस्थित अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याचे रिमोटची कळ दाबून अनावरण केले. त्यानंतर बांबू वाचनालयात रमेश सातपुते यांनी लावलेल्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन केले.
यावेळी चित्रकार रमेश सातपुते, मूर्तीकार संजय गारजलवार आणि शाखा अभियंता शिरीष तारे यांचा ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, नगरसेवक निशांत गांधी, किशोर जिचकार, जगदीश ग्वालबंशी, माजी आमदार डॉ. मधुकर वासनिक, माजी आमदार यादवराव देवगडे, महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. राजाभाऊ शिलेदार, जयप्रकाश गुप्ता, रवी अग्रवाल, रमेश मंत्री, कपिल चांडक, अनिल हस्तक, मीनाताई जोशी, गणेश कुल्हार, श्रीकांत देशपांडे, प्रदीप डहाके, सुरेश कुळकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार नगरसेवक सुनील हिरणवार यांनी मानले.
‘शिवमुद्रा’ने आणली रंगत
कार्यक्रमस्थळी शिवमुद्रा ढोल, ताशा व ध्वज पथकाने प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाप्रसंगी ढोल, ताशा वाजवून रंगत आणली. त्यांच्या पथकाच्या संचलनने स्फुरण चढविले.