संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थेमध्ये १५ स्मार्ट ई – बसेस (इलेक्ट्रिक बस) ची भर पडणार आहे. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड तर्फे १५ स्मार्ट ई-बसेस खरीदी करुन परिवहन विभागाला हस्तांतरित केली जाईल. अशी माहिती महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी दिली. याचा लाभ नागपूरच्या जनतेला होईल तसेच वायु प्रदुषण कमी करण्यात मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
शहराच्या वायु प्रदुषण लक्षात घेता हा महत्वपूर्ण निर्णय नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी (६ ऑगस्ट) रोजी घेण्यात आला. बैठक स्मार्ट सिटीचे सभापती व मेंटोर डॉ.संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ते मुंबई वरुन बैठकीत ऑन लाईन जुळले होते. मनपा मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीमधील स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. , नागपूर जिल्हाधिकारी आर.विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चा अतिरिक्त कार्यभार असलेले मनोजकुमार सुर्यवंशी, इंडीपेंडेंट डायरेक्टर अनिरुध्द शेणवाई आदी उपस्थित होते.
नागपूर स्मार्ट सिटीच्या मोबिलीटी विभागातर्फे १५ बस खरीदी करण्याचा प्रस्ताव होता. विभागाच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने एकमताने मंजूरी प्रदान केली. यासाठी संपूर्ण प्रक्रिया व खर्च स्मार्ट सिटी तर्फे करण्यात येईल.
बैठकीत महापौर म्हणाले, नागपूर शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस व सीएनजी वर आधारित बस चालविण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना आहे. यादृष्टीने हे महत्वाचे पाउल असून पर्यावरणपूरक परिवहन व्यवस्था निर्माण करुन नागपूर देशाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनपाच्या परिवहन सेवेमध्ये महिलांसाठी विशेष ‘तेजस्विनी’ इलेक्ट्रिक बस सुरु करण्यात आली आहे.
यासोबत आता १५ स्मार्ट ई-बसेस सुद्घा नागपूरकर जनतेच्या सुविधेकरिता सुरू होत आहेत. नागपूर स्मार्ट सिटीच्या पारडी, भरतवाडा, पुनापुर, भांडेवाडी क्षेत्राचा नागरिकांना शहराचा दूस-या भागात जाण्यासाठी या बसची मदत होईल, असा विश्वासही महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.