Published On : Tue, Apr 15th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या शिक्षक भरती घोटाळा;’त्या’ नियुक्त्या रद्द होणार,मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 580 शिक्षक भरतीतील अनियमिततेने खळबळ माजवली आहे. खासगी प्राथमिक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती झाल्याचे उघडकीस आले असून, ही नेमणूक प्रक्रिया संपूर्णपणे बनावट दस्तऐवजांवर आधारलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे शासकीय तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. शिक्षण विभागानेदेखील यासंदर्भात आपल्या आदेशातून याची कबुली दिली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

दोषी ठरल्यास शिक्षकांकडून वेतनाची वसुली होणार-
या प्रकरणात गुन्हेगार कोणताही असो, त्याला सोडणार नाही, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. याशिवाय, जे शिक्षक बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरीवर होते, त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेले वेतन परत घेण्याच्या दृष्टीनेही विचार सुरू आहे. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या 580 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gold Rate
15April 2025
Gold 24 KT 93,500/-
Gold 22 KT 87,000/-
Silver / Kg - 95,800/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रत्येक फसव्या नेमणुकीसाठी लाखोंचा व्यवहार-
या शिक्षक भरती गैरव्यवहारात एका नेमणुकीसाठी 20 ते 35 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतल्याचेही उघड झाले आहे. शासकीय यंत्रणेतील काही व्यक्तींच्या संगनमताने बनावट शालार्थ आयडी तयार करून शिक्षक व कर्मचाऱ्यांना नेमले गेले. या बनावट शिक्षकांच्या खात्यात नियमित वेतनही जमा होत असल्याचे निष्पन्न झाले असून, आता याची सखोल आर्थिक चौकशी पोलीस करणार आहेत.

नवीन तक्रारीमुळे तपासात आणखी गती –
या प्रकरणात आणखी एक नवीन तक्रार दाखल झाली असून, भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील शाळेत दोन शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन उपसंचालक वैशाली जामदार यांच्या कार्यकाळातील या नेमणुकीमध्ये शिक्षण संस्थाचालक, उपसंचालक कार्यालयातील अधिकारी आणि इतर काही संबंधित व्यक्ती सहभागी असल्याचे तक्रारीत नमूद आहे. नवप्रभात शिक्षण संस्थेचे पदाधिकारी रामलाल चौधरी आणि हेमंत बांडेबुचे यांनी ही तक्रार नोंदवली आहे.

Advertisement
Advertisement