नागपूर : शहरातील खामला परिसरात 150 रहिवाशांची फसवणूक करत 11 कोटी रुपयांचा क्रेडिट कार्ड घोटाळा उघडकीस आला आहे. नागपूर टुडेने याप्रकरणावर प्रकाश टाकत पीडितांशी काल चर्चा केली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मयूर सुरेश निमजे (रामेश्वरी ) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी सचिन हरीश शभुवानी (खामला)हा आद्यपही फरार आहे.
डीसीपी झोन १ चे लोहित मतानी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यांनी सायबर पोलिसांनाही प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी प्रताप नगर पोलिसांशी जोडले असल्याची माहिती ‘नागपूर टुडे’ला दिली. आम्ही प्रकरणाचा तपास बारकाईने सुरु केला असल्याचे मतानी म्हणाले.
खामला परिसरातील नागरिकांना विश्वासात घेत दोन्ही आरोपींनी त्यांची फसवणूक केली. 2022 पासून सुरू झालेला हा घोटाळा अनेक महिन्यांपर्यंत कुणाच्याही लक्षात आला नाही.अखेर येथील नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.प्रताप नगर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
पीडितांना विश्वासात घेऊन गुन्हेगारांनी त्यांचे क्रेडिट कार्ड तपशील शेअर करण्यास पटवून दिले. कालांतराने, फसव्या व्यवहारांसाठी या तपशीलांचा गैरवापर केला गेला आरोपींपैकी एक जण पीडितांच्याच परिसरात राहत होत. त्यांच्या जवळचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन त्याने वारंवार पीडितांना लुटले.
या प्रकरणात टर्निंग पॉइंट आला जेव्हा एका कथित मास्टरमाइंडने व्हिडिओवर गुन्ह्याची कबुली दिली. घोटाळा कसा अंमलात आणला गेला याची माहितीही त्याने सांगितली. याबाबत इतके ठोस पुरावे असूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पीडित, ज्यांपैकी अनेक मध्यमवर्गीय व्यक्ती आहेत ज्यांनी लाखो रुपये या घोटाळ्यात गमावले आहे.
दरम्यान ‘नागपूर टुडे’ ने केलेल्या वृत्तानंतर पोलीस प्रशासनाने आरोपीला तडकाफडकी अटक केल्यानंतर सर्व पीडित नागरिकांनी नागपूर टुडेच्या टीमचे आभार मानले.