नागपूर: मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री एका तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी चार राउंड फायरींग केले, ज्यामध्ये 35 वर्षीय सोहेल खान याला चार गोळ्या लागल्या यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कारमधून आले आणि अचानक गोळीबार सुरू केला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच मानकापूर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, इतर दोन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव डोंगरे आणि दुसऱ्याचे नाव मसराम असल्याचे सांगण्यात येत आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस सतत शोधमोहीम राबवत आहेत.
या हत्याकांडामुळे मानकापूर परिसरासह संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हत्येमागील खरी कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राथमिक चौकशीत ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की फरार आरोपींनाही लवकरच अटक करून या हत्याकांडाचा उलगडा केला जाईल.