Published On : Mon, Mar 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘नागपूर टुडे’ स्टिंग ऑपरेशन; टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट्सने ‘या’ डमी स्कूल्सच्या नावांचा केला पर्दाफाश!

सीबीएसईचाही राहिला नाही धाक 

नागपूर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) डमी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना इशारा दिला आहे. नियमित वर्गात न येणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सीबीएसईने म्हटले आहे. मात्र असे असले तरी नागपुरात सीबीएसईच्या नियमांना केराची टोपली दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘नागपूर टुडे’च्या टीमने टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट्सशी स्टिंग ऑपरेशनद्वारे डमी स्कूल्ससोबत सुरु असलेल्या गोरखधंद्यासंदर्भात भाष्य केले. यात आकाश इन्स्टिट्यूट आणि एलनसारख्या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. या दोन्ही कोचिंग संस्थांच्या समुपदेशकांसोबत साधलेला संवाद तुम्ही इथे ऐकू शकता.

कोचिंग सेंटर्सचे ‘या’ डमी स्कूलशी साटेलोटे –
शहरात विविध ठिकाणी कोचिंग हब उदयास आल्या आहेत. येथे बहुतेक जेईई आणि नीटची तयारी केली जाते. विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी कोचिंग सेंटर्स बनावट शाळा देतात.या कोचिंग इन्स्टिट्यूटचे या डमी शाळांशी साटेलोट असते.आकाश इन्स्टिट्यूटच्या सदस्यांशी संवाद साधला असता त्यांनी काही डमी स्कूलची नावे आम्हाला सांगितली. सॅन्ट्रोल   स्कूल,सेंट झेवियर्स स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल,(लावा), संचेती स्कूलशी आकाश इन्स्टिट्यूटचे टायअप असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकाराने आम्ही नागपुरातील प्रसिद्ध एलन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांनीही आम्हाला सेंटर पॉइंटच्या तिन्ही ब्रांच, संचेती स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या चार ब्रांच , सेंट पॉल स्कूल आदी शाळांची नावे सांगितली.

डमी शाळा म्हणजे काय-
डमी शाळा म्हणजे  अशा शाळा आहेत जिथे विद्यार्थ्यांना नियमितपणे उपस्थित राहणे बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांवरील शाळेचा भार कमी करण्यासाठी कोचिंग संस्था नियमित शाळांशी करार करतात. त्यामुळे त्यांना प्रवेश परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई आणि नीट या दोन प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये डमी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची ही संकल्पना सर्वात लोकप्रिय आहे.
हा एक प्रकारचा व्यवसायच – 

पालकांनी आपल्या मुलांना कितीही महागड्या शाळांमध्ये शिक्षण दिले तरी, त्यांना भीती असते की कोचिंगशिवाय त्यांच्या मुलांना चांगले गुण मिळणार नाहीत. कोचिंग इन्स्टिट्यूट आणि डमी स्कूलमध्ये खोलवरचे नाते आहे. या संस्थांमध्ये नीट आणि जेईई कोचिंगसाठी येणाऱ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना संस्थांकडून मध्यस्थांच्या मदतीने डमी शाळांमध्ये प्रवेशासाठी विनंती केली जाते. सीबीएसई संलग्न डमी शाळांची यादी तयार केल्यानंतर हे मध्यस्थ दर आठवड्याला कोचिंग संस्थांना काही भेटी देतात जिथे इच्छुक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हे मध्यस्थ विद्यार्थ्यांना डमी शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या बदल्यात कोचिंग सेंटरना कमिशन देतात. याअंतर्गत लाखो करोडोंचा व्यवहार करण्यात येत असल्याचा अंदाज आहे.

सीबीएसईच्या नव्या नियमांचाही राहिला नाही धाक – 
देशात ‘डमी स्कूल’ची संस्कृती वेगाने पसरली आहे. विशेषतः प्रसिद्ध शहरांमध्ये ही प्रवृत्ती वर्षानुवर्षे प्रचलित आहे. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीसाठी कोचिंग घ्यायचे असते ते औपचारिकपणे कोणत्यातरी शाळेत प्रवेश घेतात पण तिथे कधीच जात नाहीत. तो आपला सर्व वेळ कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये घालवतो. आता सीबीएसईने अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.नियमित वर्गात न येणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सीबीएसईने म्हटले आहे. मात्र नागपुरातील आकाश आणि एलनसारख्या कोचिंग इन्स्टिट्यूटला सीबीएसईच्या नियामांशी काहीही घेणेदेणे नाही. समुपदेशकांचे म्हणणे आहे की, असे नियम येत जात असतात याचा आमच्या कामावर काहीच परिणाम पडत नाही.

.. By Vanshika Malviya and Radhika Gupta