नागपूर: छत्तीसगढमधील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या तीन मुलींनी महिला वॉर्डन आणि महिला पोलिसांना खोलीत डांबून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. या तीन मुली पळ काढून दुचाकीवरून नागपुरात दाखल झाल्या .या तीन अल्पवयीन दुचाकीवरून जात असताना महिला वाहतूक पोलिसांना संशय आला. त्यांना थांबवून चौकशी केली. मुलींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. तिन्ही मुलींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तीनपैकी दोन मुली चक्क हत्याकांडातील असून एक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीनही मुलींना छत्तीसगढ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
शनिवारी वाहतूक शाखा लकडगंज झोन अंर्तगत वर्धमाननगर चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार वैशाली दुरूगकर व पोलीस अंमलदार पूजा या कर्तव्यावर होत्या. त्यांना नंबर प्लेट नसलेल्या एका अॅक्टिव्हा दुचाकीवर तीन मुली, विना हेल्मेट संशयितरित्या येताना दिसल्या. त्यांनी मुलींना थांबविले. त्यांची चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आले.
माहितीनुसार, तीनही मुली अल्पवयीन असून त्या ५ जुलैला रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास राजनांदगाव, छत्तीसगढ येथील बालसुधारगृहातून पळून आलेल्या आहेत. दोन मुलीवर खुनाचा तर एका मुलीवर चोरीचा आरोप आहे. पाच जुलैच्या रात्री खोलीत आग लागल्याची खोटी बातमी पसरवून तिन्ही मुलींनी आरडा ओरड केली. तत्पूर्वी त्यांनी खोलीत ऑईल टाकले. महिला वॉर्डन धावत येताच मुलींनी त्यांना खोलीत ढकलले आणि बाहेरून दार बंद केले. मुलींनी त्यांचीच दुचाकी घेऊन पळ काढल्याची माहिती आहे.