नागपूर: राज्याची उपराजधानी आणि गृहमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून गेल्या चोवीस तासांत चार हत्याकांडाच्या घटनाने शहर हादरले आहे.
शहरातील दोन नामांकित व्यापाऱ्यांचे अपहरण करून गोळ्या घालून खून करण्यात आला. दोघांचेही मृतदेह नदीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निरालाकुमार सिंह (४३, एचबी टाऊन) आणि अंबरीश देवदत्त गोळे (४०) असे खून झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. दोन्ही व्यापारी एकमेकांचे मित्र होते. दोघांचेही हिस्लॉप महाविद्यालयाजवळील चिटणवीस सेंटरजवळून अज्ञात आरोपींनी अपहरण केले. दोघांनाही गोळ्या घालून ठार मारल्यानंतर कोंढाळी परिसरात दोघांनाही जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दोघांचेही अर्धवट जळालेले मृतदेह कारमध्ये भरून वर्धा नदीत फेकून देण्यात आले. एका व्यापाऱ्याचा मृतदेह तिवसाजवळील एका गावात तर दुसऱ्याचा खडगा गावाजवळ सापडला.
ओंकार महेंद्र तलमले (वय २५ वर्ष रा. स्मृती लेआउट), हर्ष आनंदीलाल वर्मा(वय २२ वर्ष, रा. वाडी) ,दानेश दुर्गाप्रसाद शिवपेठ (वय २१ वर्ष, गोधनी),लकी संजय तुर्केल (वय २२ वर्ष रा. मरियम नगर, सिताबडी), हर्ष सौदागर बागडे (वय १९ वर्ष रा. दत्तवाडी,) अशी आरोपींची नावे आहेत.कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी विरोधात कलम ३०२,२०१, ३४ सह कलम ३,२५ भारतीय हत्या कायदा या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.