१९ सप्टेंबर २०२२ ला १०:०० वाजता महात्मा फुले परिसर कॅम्पस नागपुर विद्यापीठ येथे सीनेट परिवर्तन पैनल द्वारा धरणे आंदोलन केल्या गेले. बासा द्वारे नियोजित ह्या आंदोलनात प्रहार जनशक्ति पक्ष नागपुर , भीम आर्मी , एचआरपीएफ , बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा तर्फे माजी सीनेट सदस्य श्री शीलवन्त मेश्राम व मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शुल्कवाढ रद्द करण्याच्या मागणीसह विविध शैक्षणिक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक रूप धारण केले. विद्यार्थ्यांनी सोमवारी अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पसचे गेट बंद करीत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. गेट बंद असल्याने कुणालाच आत जाता येत नव्हते. त्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. अखेर प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पीएच. डी. पदवीच्या प्रवेश नोंदणी शुल्कात केलेली शुल्कवाढ रद्द करावी. ‘कमवा आणि शिका’ योजनेतील मानधन व जागांची उपलब्धता वाढविण्यात यावी, मागेल त्यांना काम या तत्त्वावर ही योजना पूर्ववत राबविण्यात यावी. पदव्युत्तर पदवी करणाऱ्या नागपूर विद्यापीठात दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांनासुद्धा वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा. विद्यापीठाच्या सर्व ग्रंथालयांत विद्यार्थ्यांना खुला प्रवेश मिळावा, प्रवेशीत विद्यार्थ्यांकरिता व्यायामशाळा विनाशुल्क करण्यात यावी, विद्यापीठाच्या विभागांमध्ये आणि ग्रंथालयात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नियमित करण्यात यावी.
विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने योग्य ती यंत्रणा कार्यान्वित करावी, पदव्युत्तर पदवी वस्तीगृह प्रवेश शुल्कात पाच टक्के वाढ करणारे परिपत्रक रद्द करावे, विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर येथे ३०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह निर्माण करण्यात यावे. विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरात ५०० विद्यार्थी बसतील या क्षमतेचे ग्रंथालय उभारावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे अमरावती रोडवरील वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती.
आंदोलनकर्त्यांत प्रामुख्याने प्रहार जनशक्ती पक्ष नागपूरचे श्री राजेश बोढारे , अरमान खान आणि कार्याध्यक्ष शबीना शेख तसेच एचआरपीएफ चे श्री आशिष फुलझेले , भीम आर्मी चे श्री अंकित राऊत , श्री प्रशांत बनसोड , बासा चे सदस्य शुभांगी खंडारे , प्रगती बोरकर , रोहिणी खोब्रागडे , श्री प्रज्ञानंद माटे , श्री किरण वाकुडकर सहभागी होते . बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा तर्फे माजी सीनेट सदस्य श्री शीलवन्त मेश्राम यांच्या मार्गदर्शनात कुलगुरु श्री सुभाष चौधरी सर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली . प्रसार माध्यमांशी बासा अध्यक्ष डॉ श्री प्रवीण अवघड यांनी संवाद साधत संपूर्ण आंदोलनाची आणि शिष्ठमंडळाशी झालेल्या चर्चेची माहिती दिली.