नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थेतर युवक अनधिकृतरित्या राहत असल्याचे समोर आले होते. या गैरप्रकाराला स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कठोर पवित्रा घेत अनधिकृतरित्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास बजावले होते. आता एक वर्षानंतर नेमकी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नागपूर टुडे प्रतिनिधीने विद्यापीठ कॅम्पस परिसरातील पदव्यूत्तर वसतिगृह आणि लॉ कॉलेज चौक येथील विद्यापीठ वसतिगृहामध्ये भेट दिली.
तेव्हा विद्यापीठ कॅम्पस परिसरातील वस्तीगृहामध्ये ‘वॉर्डन’ गैरहजर असल्याचे आढळले. तसेच विद्यार्थ्यांच्या खोल्यांच्या दरवाजांना देखील कुलूप होते. तेथील सुरक्षारक्षकांने सांगितले की, वॉर्डन वसतिगृहामध्ये कधीच येत नाहीत. स्वातंत्र्य दिन, महापुरुषांच्या जयंत्या आणि वसतिगृहात नवीन प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीतच त्यांचे दर्शन होते अशी माहिती काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. हे गृहस्थ विद्यापिठ परिसरातील वाचनालयात कार्यरत असून त्यांच्याकडे वॉर्डन म्हणून वसतीगृहाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आल्याचे कळाले.
अशीच परिस्थिती लॉ कॉलेज चौकातील वसतिगृहात आढळून आली. तेथे भेट दिली असता ‘वॉर्डन’ महत्वाच्या कायदेविषयक उच्चस्तरीय बैठकीसाठी गेल्याची माहिती कार्यालयातील लिपिकाने दिली. या वसतिगृहात वॉर्डन म्हणून अतिरिक्त कार्यभार असलेले गृहस्थ विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागात इतिहास या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यामुळे ते केवळ संध्याकाळी ४:३० ते ५ या दरम्यान वसतिगृहातील कार्यालयात उपस्थित असतात, अशी माहिती लिपिकाकरवी मिळाली.
शनिवारी या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली होती. तो मूळचा यवतमाळचा असून बीएड अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. त्यामुळे सध्या वसतिगृहातील वातावरण तापलेले आहे. लिपिकाने सांगितले की, आता वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मित्र किंवा इतर कुणी थांबल्यास २ एप्रिल २०१८ पासून एका रात्रीसाठी ५० रुपये मुक्काम भाडे आकारले जाते. त्याचप्रमाणे आता वसतिगृहातील एकही विद्यार्थी अनधिकृत नसल्याचेही ते म्हणाले. या वसतिगृहात एकूण १९० खोल्या असून त्यांमध्ये ३८० विद्यार्थी राहतात.
विधी अभ्रासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वतंत्र वसतिगृह इमारतीचे नूतनीकरण सुरु असून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार येथे ‘वायफाय’ सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे. परंतु अजूनही अनेक विद्यार्थी आपल्या खोल्यांमध्ये इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करीत असल्याने वीज देयकात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या खोल्यांमधील ‘पॉवरपॉईंट’ सॉकेट काढून ‘टू पिन’ सॉकेट बसवण्यात आले आहेत. पण तरीही विद्यार्थी ‘टू पिन’ सॉकेटवर शेगडी लावतात, ज्यामुळे खोल्यांतील ट्यूबलाईट वारंवार ‘फ्यूज’ होत असल्याची तक्रार करत विद्यार्थी शिस्त मोडून बेजाबदारपणे वागत असल्याचे लिपिकाने सांगितले.
एकूणच पाहता विद्यापीठाचे साफ दुर्लक्ष तसेच वॉर्डनच्या स्वतंत्र पदाची तरतूद नसल्याने विद्यापीठाच्या वसतिगृहात अजूनही काही प्रमाणात मनमानी कारभार चालू आहे.
—Swapnil Bhogekar