नागपूर – नागपूर येथील विधानभवन संकुलाच्या विस्तार कामांना गती देण्यासाठी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. येत्या काळात सदस्यसंख्या वाढणार असल्याने बसण्याची व्यवस्था व आवश्यक सुविधा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.
सभापती शिंदे म्हणाले, “जसे दिल्लीला नवीन संसद भवन उभे राहिले, तसेच नागपूरच्या विधानभवनाच्या विस्तारासाठीही गतीने काम सुरू व्हावे.” यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला १४ महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करत दिशा दिली.
देखभाल खर्च कमी करण्यावर भर-
हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी सुमारे कोट्यवधींचा खर्च होत असतो. त्यामुळे वर्षभर वापरता येईल अशा योजनांचे नियोजन करावे, जेणेकरून देखभाल खर्चात कपात करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
एन कुमार हॉटेलची अधूरी इमारत होणार अधिग्रहित-
विधानभवनासमोरील एन कुमार हॉटेल्सची अपूर्ण इमारत सरकार अधिग्रहित करणार असून, त्यासाठी नव्याने मूल्यांकन करून प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वन विभागाच्या लागून असलेल्या जागेचे हस्तांतरण करून विधानभवन विस्तारासाठी वापरण्याचा प्रयत्न देखील सुरू करण्यात येणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले.