नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात १७ मार्च रोजी रात्री हिंसाचाराची घटना घडली.सोमवारी उसळलेल्या दंगलीच्या घटनेनंतर शहरातील पोलिसांनी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरक्षेच्या कारणास्तव संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचारबंदी उठविण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी दुपारी तीन वाजतापासून संपूर्ण शहरातील संचारबंदी हटवण्यात आली. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. मात्र, दंगलग्रस्त भागाशिवाय अन्य परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे टप्प्याटप्य्याने संचारबंदी उठविण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती.
गुरुवारी नंदनवन व कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णत: हटविण्यात आली. तर शनिवारी पुन्हा पाच ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णत: हटविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. यामध्ये परिमंडळ ३ अंतर्गत येणाऱ्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज तसेच परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या सक्करदरा आणि इमामवाडाचा समावेश आहे. मात्र, यशोधरानगरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली होती. कोतवाली, तहसील, गणेशपेठमध्ये सायंकाळी ७ ते रात्री १० वाजतापर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. व्यापाऱ्यांचे नुकसान आणि विद्यार्थांची शाळा बंद असल्याने होणारे नुकसान पाहता शनिवारी पोलीस आयुक्तांकडून स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णत: हटविण्याचे निर्देश दिले.
परिमंडळ तीनमधील कोतवाली, तहसील, गणेशपेठ हद्दीतील संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत लोक बाहेर पडू शकतात आणि या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येऊ शकते, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी पाहता रविवारी दुपारी तीन वाजतापासून शहरातील संपूर्णतः संचारबंदी हटवली. तसे आदेश पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी जारी केले. स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.