नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात १७ मार्च हिंसाचाराची घटना घडली. या दंगलीनंतर पहिल्यादांच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात दाखल झाले. आज मुख्यमंत्र्यांनी पोलीस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढील कारवाईसंदर्भात माहिती दिली.
मालमत्तांचे नुकसान झालेल्यांना पुढील काही दिवसांत नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत. त्यांनी पैसे दिले नाही, तर त्यांच्या मालमत्ता विकणार, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
ज्या लोकांचे नुकसान झाले आहे. काहींच्या गाड्या फुटल्या आहेत. त्या सगळ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. आता जे काही नुकसान झालेलं आहे. ते सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल. दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत, तर त्यांची संपत्ती विकली जाईल. नागपूरसह संपूर्ण राज्यात अशा घटना सहन केल्या जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
नागपूर दंगलीची सुरुवात कशी झाली याबाबत फडणवीस यांनी माहिती पत्रकारांना माहिती दिली. कुराणची आयत असलेली चादर जाळल्याचा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला. त्यानंतर जमाव संध्याकाळी तयार झाली त्यानंतर दंगल घडली.
हिंसाचारात सहभागी ९२ जणांना अटक,१२ अल्पवयीन ताब्यात-
या हिंसाचारप्रकारणी पोलिसांनी आतापर्यंत ९२ जणांना अटक केली आहे. यात १२ अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते. त्याचबरोबर लोकांनीही मोबाईलवर केलेलं चित्रीकरण, पत्रकारांनी पोलिसांना दिलेले चित्रीकरण. अशा चित्रिकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत, त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. १०४ लोकांची ओळख पटली आहे. ९२ लोकांना अटक करण्यात आली आहे. आणि १२ जण हे १८ वर्षाखालील विधिसंघर्षग्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर कायद्याने जी कारवाई करता येते, ती करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
चिथावणीखोर पोस्ट करणाऱ्यांनाही बेड्या –
सोशल मीडियाची पडताळणी करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा याला चिथावणी देण्यासाठी पोस्ट केल्या. त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवले जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकावण्यासाठी मदत केलेली असल्याचे फडणवीस म्हणाले. जवळपास ६८ पोस्ट या आतापर्यंत शोधण्यात आल्या आहेत आणि त्या हटवण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.