नागपूर :शहरातील महाल परिसरात १७ मार्च रोजी रात्री दोन गटांमधील वादानंतर हिंसक संघर्ष झाला, ज्यामुळे तोडफोड आणि जाळपोळ झाली. अनेक वाहने जाळण्यात आली असून, दगडफेक मारहाण झाली.यात अनेक जण जखमी झाले. या हिंसाचारात वेल्डर कामगार इरफान अन्सारीचा मृत्यू झाला.या प्रकरणात, तहसील पोलिसांनी कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या संतोष गौरला अटक केली आहे.
महाल परिसरात झालेल्या हिंसाचारात इरफान अन्सारी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तहसील पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान, संतोष गौर आणि इतर आरोपींच्या जमावाने इरफानवर हल्ला केल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी संतोष गौरची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. मात्र, त्याच्या अटकेनंतर राजकीय वातावरणही तापले आणि अनेक लोक तो निर्दोष असल्याचे सांगत पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींना अद्याप पोलिसांनी पकडलेले नाही आणि त्यांचाही शोध सुरू आहे.
संतोष गौर यांच्या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की संतोष सहा वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त आहे आणि त्याला नीट चालता येत नाही. अशा परिस्थितीत तो कोणावरही हल्ला कसा करू शकतो? त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री संतोष त्याच्या हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी बाहेर गेला होता.
घरी परतत असताना, एक गूढ व्यक्ती त्याच्या घरी आली ज्याच्याशी तो थोडा वेळ बोलला. यानंतर, पोलिस अचानक घरी पोहोचले आणि चौकशीच्या बहाण्याने संतोषला सोबत घेऊन गेले. काही तासांनंतर त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.