नागपूर: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात १७ मार्च रोजी उफाळलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे.मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.या अटकेमुळे सोशल मीडियाद्वारे लोकांना भडकविणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सोमवारी 17 मार्चला महाल आणि हंसापुरी येथे मोठा हिंसाचार घडला.यादरम्यान समाजकंटकानी पोलिसांवर हल्ले, जाळपोळ आणि दगडफेक केली. यात अनेक नागरिक तसेच पोलिस कर्मचारी जखमी झाले.
या हिंसाचाराचे नियोजन सकाळीच करण्यात आले होते. सोशल मीडिया अकाउंट्सच्या चौकशीदरम्यान हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सोशल मीडियाद्वारे हिंसाचार करण्यास लोकांना भडकविण्यात आले. यानुसार पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलिस सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहेत. या दिशेने पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे.
नागपूर हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी अटक –
नागपूर हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी हमीद आणि शहजाद यांना अटक करण्यात आली आहे. १७ मार्च रोजी सकाळी हमीद इंजिनिअरने मुजाहिदीनसाठी देणग्या गोळा करण्याचे आवाहन केले होते. त्याला विचारले असता, त्याने गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचे सांगितले.
या हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खान याला अगोदरच पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान हा हमीदच्या पक्षाचा नेता आहे. यावरून असे दिसून येते की हमीदने हिंसाचारातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे, शहजाद खानने हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याचे वक्तव्य प्रसारित केले होते. यामध्ये, फहीम खान लोकांना एका विशिष्ट धर्माविरुद्ध आणि पोलिसांविरुद्ध भडकावत आल्याचे समोर आल्याने नागपुरात दंगल घडल्याचे सांगण्यात येत आहे.