नागपूर : महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शोषित, वंचित अशांना माणूस म्हणून उभे राहण्याची ताकद दिली, तसेच जगातील सर्वोत्कृष्ट अशी संविधान घटना या देशाला बाबासाहेबांनी दिली.
संविधान रुपी ग्रंथाची जोपासना करू, त्याला टिकवू त्याचे रक्षण करू, हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी राज्य सरकारवर सडकून टीका करत नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आरोग्य खात्यातले घोटाळे बाहेर काढणार, असा इशारा दिला आहे.
राज्यात महायुती सरकारमधील तेघेही मिळून तिजोरीची लूट करत असल्याचा घाणघातही त्यांनी केला.
आरोग्य विभागात खूप मोठे घोटाळे आहेत. विधानसभेत आरोग्य खात्यातला भोंगळ कारभार समोर आणू. तानाजी सावंत यांचे अनेक घोटाळे आहेत. आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत. ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये मांडू, असे वडेट्टीवार म्हणाले. या घोटाळ्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना करणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
आरोग्य विभागात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. नाहीतर चोरांना समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू नका, असा सल्ला वडेट्टवार यांनी दिला.