नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ब्रिज स्पर्धेत नागपूर संघ चॅम्पियन ठरला. शंकर नगर येथील विदर्भ ब्रिज असोसिएशनच्या क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेत विदर्भातील ६० पेक्षा अधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. ‘चॅम्पियन’ नागपूर संघाकडून एम. मोर, व्ही. पुराणिक, व्ही. साबू, एस. वाटवे, एम. लुले आणि एम. दत्ता यांनी विजयी कामगिरी केली. मोहोता संघ उपविजेता ठरला. उपविजेत्यांच्या संघाकडून वसंत आणि अनुराग मोहोता या पिता पुत्र जोडीसह एस. छाजेड आणि अनिलकुमार मोहोता यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. प्लेवेल संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्लेवेल संघाकडून राजा आणि अमित रेवतकर या पिता पुत्र जोडीसह नीरज आणि संजीव कुमार या भावंडांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
नागपूर २ ने पेअर्स प्रोग्रेसिव्ह प्रकारात विजय मिळवला. विजेत्या संघात आर. देशपांडे, जी. दत्ता, एस. वाटवे आणि एम. दत्ता यांचा समावेश होता. या प्रकारात उपविजेता ठरलेल्या नागपूर १ संघामध्ये एम. मोर, व्ही. साबू, व्ही. पुराणिक आणि एम. लुले यांचा समावेश होता.
एमपी पेअर्स प्रकारात राजा आणि अमित रेवतकर या पिता पुत्र जोडीने अव्वल स्थान पटकाविले. डी मांडपे आणि एस खानझोडे जोडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. आयएमपी पेअर्स प्रकारात बसंत आणि अनुराग मोहोता या पिता पुत्र जोडीने विजेतेपद प्राप्त केले. एस. छाजेड आणि एस. रॉय उपविजेते ठरले.
स्पर्धेचे संचालन अनिलकुमार मोहोता आणि अमित रेवतकर यांनी केले. सर्व विजेत्यांना आकर्षक रोख पुरस्कार प्रदान करण्यात आली.