नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. शोक प्रस्तावानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. शुक्रवारी (८ डिसेंबर) दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल, अशी माहिती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवरुन विरोधी पक्ष विधिमंडळाच्या आवारात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी याची माळ घालून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर, शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस, विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल अशा घोषणा विरोधकांनी केल्या आहेत.