नागपूर : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेले हिवाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस (19 डिसेंबर) आहे. उद्या म्हणजेच (20 डिसेंबर) राज्याचं हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंर्दभात निर्णय घेण्यात आला. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या एकमेकांवरील खळबळजनक आरोपांमुळे गाजले.
दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे हतबल झालेला शेतकरी, विविध समाजाच्या आरक्षणासाठीच्या मागण्या, जुनी पेन्शन योजनेची मागणी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मानधन वाढीच्या मागण्या आणि कायदा-सुव्यवस्थेमुळे राज्यात निर्माण झालेले प्रश्न या मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले.
पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, आरक्षणाचा मुद्दा, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, नागपूरमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पडसाद अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरु झाले.
या अधिवेशनाच्या वेळापत्रकानुसार चार दिवस सुट्टी आणि दहा दिवसांचे कामकाज असे दोन आठवड्यांत अधिवेशन पार पडले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनापूर्वी बैठक झाली होती.