नागपूर : पंजाबी आणि सुफी संगीताच्या एकत्रित सादरीकरणात गायलेल्या गाण्यांनी युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच थिरकायला भाग पाडले.
आजपर्यंत केवळ टिव्हीवर बघितलेल्या प्रसिद्ध पंजाबी गायक हंसराज हंस यांच्या सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम उत्तर नागपुरातील लाल गोदाम भागात सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. निमित्त होते ते ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-२०१९’चे. कलाप्रेमींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी ठरलेल्या या कार्यक्रमाला मिळणारी प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे.
हंसराज यांनी गायलेल्या “जिंदगी भी दी है तो जीने का हुनर भी देना’ या त्यांच्या दिलखेचक गाण्याने टाळयांच्या कडकडाट झाला. पुढे त्यांनी सादर केलेल्या ‘जिन्हे देखने जा रहे है’ या गझलीने श्रोत्यांची वाहवा मिळविली. कार्यक्रमात नागपुरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, आमदार अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संगीतज्ज्ञ पं. प्रभाकर धाकडे, हरदेव सिंग , नवनीत सिंग तुली आदी उपस्थित होते. या लाईव्ह कॉन्सर्टला शीख समुदायातील नागरिकांनी सर्वाधिक उपस्थिती लावली.